NAZA Documentary Controversy: गाझा युद्धावर आधारित ‘नाझा’ (Naza Documentary) या ब्रिटिश डॉक्युमेंट्रीमुळे इस्रायलमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या डॉक्युमेंट्रीला स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला. स्क्रीनिंगनंतर तब्बल 25 मिनिटं प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. मात्र, दुसरीकडे इस्रायलमध्ये या सिनेमावर तीव्र आक्षेप घेतला जातोय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी ‘नाझा’वर प्रश्न उपस्थित करत हा सिनेमा यहुदीविरोधी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर आता या डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्यांची नागरिकता रद्द करण्याची शक्यताही चर्चेत आली आहे. नेमका हा वाद काय आहे?

‘नाझा’ नेमकी कशावर आधारित आहे?

‘नाझा’ ही गाझा संघर्षावर आधारित 80 मिनिटांची डॉक्युमेंट्री आहे. 10 सप्टेंबर 2026 रोजी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या डॉक्यूमेंट्री दाखवण्यात आली. गाझा युद्धादरम्यान इस्रायली सैन्याच्या कारवाईत पॅलेस्टिनी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूबाबत या डॉक्युमेंट्रीमध्ये दावे करण्यात आले आहेत. या सिनेमासाठी इस्रायली सैन्य आणि इंटेलिजन्सशी संबंधित 24 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या सर्वांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. गाझा पट्टीमध्ये लक्ष्य कसं ठरवलं जात होतं, लष्करी कारवाई कशा पद्धतीने केली जात होती, यासह युद्धाशी संबंधित अनेक बाबी या मुलाखतींच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पत्रकार युवल अब्राहम आणि राहेल झोर यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे. यापूर्वी दोघांनी ‘नो अदर लँड’ ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. या सिनेमाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आता ‘ नाझा’मुळे पुन्हा एकदा दोघे चर्चेत आले आहेत.

व्हेनिसमध्ये कौतुक, इस्रायलमध्ये विरोध

‘नाझा’च्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील प्रदर्शनाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्क्रीनिंग संपल्यानंतर सुमारे 25 मिनिटं प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. डॉक्युमेंट्रीला स्पेशल ज्युरी पुरस्कारही मिळाला. मात्र, याच सिनेमामुळे इस्रायलमध्ये वादाला तोंड फुटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘ नाझा’वर तीव्र आक्षेप घेतला. गाझामधील इस्रायली लष्करी कारवाईवर आधारित हा सिनेमा धक्कादायक असून, जगभरातील यहुदीविरोधी द्वेषाला खतपाणी घालणाऱ्या प्रयत्नांचा तो भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.नेतन्याहू यांनी टेलिग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या सिनेमावर टीका केली. विशेष म्हणजे, हा विरोध बाहेरच्या लोकांकडून नव्हे तर इस्रायली नागरिकांकडून होत असल्याने हे अधिक गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं.

मेकर्सची नागरिकता खरंच रद्द होणार?

‘नाझा’च्या निर्मात्यांसाठी सर्वात गंभीर बाब म्हणजे आता त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. इस्रायलचे सांस्कृतिक मंत्री मिकी जोहर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डॉक्युमेंट्रीसाठी माहिती आणि कंटेंट कसा मिळवण्यात आला, याची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं आहे. युद्धाच्या काळात ही माहिती मिळवण्याची किंवा ती प्रकाशित करण्याची प्रक्रिया शत्रूला मदत करण्याच्या स्वरूपाची होती का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.मिकी जोहर यांनी इस्रायलच्या गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आलेले दावे खोटे असून ते विकृत पद्धतीने मांडण्यात आले आहेत, असा त्यांचा आरोप आहे. इस्रायली सैनिक आणि इस्रायलला जाणीवपूर्वक गुन्हे करणारे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आपण पूर्णपणे फेटाळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व कायद्यातील तरतुदीचा उल्लेख

मिकी जोहर यांनी आपल्या पत्रात इस्रायलच्या नागरिकत्व कायद्याचाही उल्लेख केला आहे. इस्रायल राज्याप्रती निष्ठा तोडल्याच्या कारणावरून नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद कायद्यात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.त्यामुळे ‘नाझा’च्या निर्मात्यांवर केवळ टीका किंवा कायदेशीर कारवाईची मागणीच होत नाही, तर त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. इस्रायल सरकारमधील काही सदस्यांनी डॉक्युमेंट्रीवर आक्षेप घेतला असून इस्रायल डिफेन्स फोर्सेसनेही सिनेमातील आरोप फेटाळून लावले आहेत.

‘नाझा’ या नावाचा अर्थ काय?

रिपोर्ट्सनुसार, ‘नाझा’ हे नाव इस्रायली सैन्यात वापरल्या जाणाऱ्या एका शब्दावरून घेतलं असल्याचं सांगितलं जात आहे. युद्धादरम्यान होऊ शकणाऱ्या संभाव्य ‘अतिरिक्त मृत्यूं’साठी या शब्दाचा वापर केला जात असल्याचा सांगितलं जात आहे. युवल अब्राहम आणि राहेल झोर यांनी या डॉक्युमेंट्रीसाठी जवळपास तीन वर्षं तपास केला. गाझा युद्धाशी संबंधित इंटेलिजन्स अधिकारी आणि सैनिकांच्या गुप्त मुलाखती या डॉक्यूमेंट्रीचा महत्त्वाचा आधार आहेत. गाझा पट्टीमध्ये लक्ष्य कसं निवडलं जात होतं आणि लष्करी कारवाईची प्रक्रिया कशी होती, याबाबत या मुलाखतींमधून माहिती समोर आणण्यात आली आहे.