Nepal Floods Marathi News: नेपाळमध्ये (Nepal) काही दिवसांपूर्वीच आलेल्या विनाशकारी पुराच्या (Floods) जखमा ताज्या असतानाच, आता पुन्हा एकदा 5 पट मोठ्या महापुराचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. नेपाळच्या नुवाकोट (Nuwakot) जिल्ह्यातील धुंडे बाजार आणि लगतच्या परिसरात प्रशासनाने तात्काळ 'पॅनिक मोड' लागू केला असून, पोलिसांकडून नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले जात आहे. वरच्या भागातून अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पुराचे पाणी खाली पोहोचू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नुवाकोट जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पोलिसांनी माईकवरून थेट अनाउन्समेंट करत नदीकाठची घरे आणि दुकाने रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरच्या भागात हिमनदी फुटल्यामुळे (glacier burst) किंवा पाणी सोडल्यामुळे त्रिशूली नदीची पातळी अचानक वेगाने वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कसलाही निष्काळजीपणा न दाखवता उंच किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

Nepal Floods Marathi News: आधीच्या तुलनेत 5 पट जास्त धोक्याची शक्यता

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संभाव्य पूर आधीच्या पुरापेक्षा कित्येक पटीने अधिक भयानक असू शकतो. त्यामुळे प्रभावित भागातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुवाकोट हा भाग भोटेकोशी-त्रिशूली नदीच्या पुरामुळे आधीच उद्ध्वस्त झाला असून तिथले अनेक रस्ते आणि पुलांचे आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Nepal Floods Marathi News: चिनी सीमेवरील डॅम्ड लेक ओव्हरफ्लो, लष्कराचे बचावकार्य स्थगित

चिनी सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ग्यिरोंग बॉर्डर पोर्टच्या वरच्या भागात बनलेली कृत्रिम तलाव म्हणजेच 'डॅम्ड लेक' आता ओव्हरफ्लो (overflow) होऊ लागली आहे. या तलावाच्या फुटण्याचा धोका असल्याने नेपाळी लष्कराने सावधगिरी म्हणून पुढील काही तासांसाठी बचावकार्य पूर्णपणे स्थगित केले आहे. तलावातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहत आल्यामुळे सखल भागात अचानक पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या नेपाळ पोलीस आणि स्थानिक प्रशासन नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून, नदीच्या पाणीपातळीवर सतत नजर ठेवली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nepal Flash Flood: नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश

Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना