Nepal Floods Marathi News: नेपाळमध्ये आलेल्या अचानक भीषण पुरामुळे मोठी हानी (Nepal Floods) झाली आहे. या जलप्रलयामुळे इमारती, गावच्या गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या पुरात आतापर्यंत 781 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. पुराचे पाणी नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली परिसरात असलेल्या कृषी विकास बँकेच्या शाखेतही शिरले आणि संपूर्ण बँक परिसर पाण्याखाली गेला. काही दिवसांनंतर परिस्थिती काहीशी सामान्य झाल्यावर बँकेत अडकलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. यावेळी बँकेतून सुमारे 50 कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने सापडले.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुरामुळे कृषी विकास बँकेची त्रिशूली-ढुंगे शाखा पूर्णपणे बाधित झाली होती. पाणी आणि चिखलामुळे बँकेतील लॉकर तसेच इतर भागांपर्यंत पोहोचणे अत्यंत आव्हानात्मक होते. असे असतानाही पोलीस आणि संबंधित पथकांनी सुमारे 8 तास सातत्याने अभियान राबवून बँकेत ठेवलेल्या मौल्यवान धातू आणि रोख रक्कम सुरक्षितपणे बाहेर काढली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अभियानादरम्यान सुमारे 50 कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने, जवळपास दीड कोटी नेपाळी रुपये रोख, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्या. याशिवाय बँकेतील महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. (Nepal Floods Marathi News)

पुरामुळे मोठी हानी, बँकेपर्यंत पोहोचणेही ठरले आव्हान- (Nepal Floods Updates)

भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमधील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्ते आणि आजूबाजूचे परिसर जलमय झाले. अनेक ठिकाणी पुराचे पाणी आणि चिखल साचल्याने मदत व बचावकार्य करण्यातही अडथळे निर्माण झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत त्रिशूली येथील बँक शाखेत ठेवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुरक्षित बाहेर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. बँक शाखा पाण्याखाली गेल्यानंतर तेथे ठेवलेले सोने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची मोठी चिंता होती. बचाव पथकाने जीव धोक्यात घालून बँकेच्या आत अभियान राबवले आणि एक-एक करून मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढल्या. सुमारे 8 तास चाललेल्या या अभियानानंतर कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने बँक अधिकारी आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, भोटेकोशीच्या पुरामुळे नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात होणारे मोठे नुकसान आणि बचावकार्यादरम्यान येणारी आव्हाने पुन्हा एकदा समोर आली आहेत.

नेपाळमध्ये पुरामुळे 781 जणांचा मृत्यू; 9435 जणांना सुरक्षित बाहेर काढले- (Nepal Floods Updates In Marathi)

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी गेल्या पाच दिवसांपासून देशात सुरू असलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्याची सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, रसुवा येथील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या जीवितहानी, आर्थिक आणि भौतिक नुकसानीचा संपूर्ण आढावा घेणे अद्याप आव्हानात्मक आहे. प्रतिकूल हवामान, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि सतत निर्माण होत असलेल्या धोक्यांनंतरही नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान शाह यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 9435 जणांना हवाई आणि रस्ते मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्यासाठी आतापर्यंत एकूण 394 उड्डाणे करण्यात आली असून, रविवारी 72 उड्डाणांचा समावेश आहे. प्रभावित भागांमध्ये नेपाळी लष्कर, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे 20618 जवान तैनात करण्यात आले आहेत. जलविद्युत प्रकल्पांच्या परिसरातून नेपाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने 279 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. भारतातील तज्ज्ञांच्या पथकाच्या मदतीने रसुवा येथील अपर त्रिशूली-1 प्रकल्पाच्या परिसरातून दोन दिवसांत 250 जणांची सुटका करण्यात आली. भारतासोबतच चीन आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञ पथकेही नेपाळी लष्करासोबत बचावकार्यात सहभागी झाली आहेत. भारतीय पथक सुरंगेत सुमारे तीन किलोमीटर आत जाऊन शोधमोहीम राबवत आहे.

प्रियजनांच्या शोधासाठी कुटुंबीयांची धावपळ, डोळ्यात अश्रू, VIDEO:

संबंधित बातमी:

Nepal Floods Marathi News: भूकंप नव्हे, ग्लेशियरचा तुकडा, कसा कोसळला?; नेपाळच्या पुराची चक्रावून टाकणारी कहाणी; व्हिडीओने A टू Z समोर आलं!