बीजिंग : रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) केवळ घरे किंवा जमिनी खरेदी करूनच मोठा नफा कमवता येतो असे जर तुम्हाला वाटत असेल, तर चीनमधील हा धक्कादायक प्रकार तुम्हाला नक्कीच थक्क करेल. एका महिला व्यापाऱ्याने भविष्यातील गरज ओळखून सुमारे 2 दशलक्ष डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 20 कोटी रुपये खर्च करून एकाच गृहप्रकल्पात तब्बल 196 पार्किंग स्पेस (Parking Spaces) खरेदी केल्या. पुढे परिसराचा विकास झाल्यावर जेव्हा पार्किंगची मागणी प्रचंड वाढली, तेव्हा या महिलेने मनमानी भाडेवसुली आणि विक्री सुरू केली. याविरोधात स्थानिक रहिवासी थेट न्यायालयात (Court) गेले, मात्र न्यायालयाने दिलेला निकाल पाहून सर्वच जण चक्रावून गेले आहेत.

China Hunan Changsha News : मागणी वाढणार असा लावला होता अंदाज

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या (SCMP) वृत्तानुसार, हे संपूर्ण प्रकरण चीनमधील हुनान प्रांतातील चांग्शा शहराशी संबंधित आहे. सन 2018 मध्ये जेव्हा या गृहप्रकल्पाचे काम सुरू होते, तेव्हा तिथे शाळा, दुकाने आणि वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीला नागरिक तिथे फ्लॅट किंवा पार्किंग खरेदी करण्यास उत्सुक नव्हते. मात्र 'वू' नावाच्या या महिला व्यापाऱ्याने परिसराचा भविष्यातील विकास ओळखला आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या बिल्डरकडून एकाच व्यवहारात 196 पार्किंग जागा खरेदी केल्या. या संपूर्ण इमारतीतील एकूण पार्किंगच्या तब्बल 40 टक्के जागा या महिलेने एकट्याने विकत घेतल्या होत्या.

China Parking Rent Surge : मागणी वाढताच आकारले मनमानी भाडे

काही वर्षांत या परिसराचा वेगाने विकास झाला आणि तिथे फ्लॅट्सची विक्री वाढली. परिणामी इमारतीमध्ये पार्किंगची मोठी टंचाई निर्माण झाली.

महिलेला हीच योग्य संधी वाटल्याने तिने सर्व पार्किंग जागांसाठी भरमसाठ किंमत लावली. एका पार्किंग स्पेसचे मासिक भाडे 7,258 रुपये निश्चित केले. तर ज्यांना जागा विकत हवी होती, त्यांच्यासाठी 14.52 लाख रुपये प्रति पार्किंग असा दर ठरवला. अचानक वाढलेल्या या भाड्यामुळे आणि टंचाईमुळे स्थानिक रहिवासी प्रचंड संतापले.

Changsha Local Court Verdict : कोर्टाने महिलेच्या बाजूने दिला ऐतिहासिक निकाल

वाढत्या भाड्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी पोलिसांत आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र प्रशासकीय मध्यस्थी निष्फळ ठरल्यानंतर रहिवाशांनी या महिलेविरोधात स्थानिक न्यायालयात दावा ठोकला. फेब्रुवारी 2024 मध्ये चांग्शा स्थानिक न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देताना महिलेच्या बाजूने कौल दिला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा बिल्डरने या पार्किंग जागा विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या, तेव्हा इमारतीतील प्रत्येक रहिवाशाकडे त्या खरेदी करण्याची समान संधी होती. वू यांनी स्वतःचे पैसे गुंतवून त्या काळात मोठा आर्थिक धोका (Investment Risk) पत्करला होता. त्यामुळे त्यांनी केलेली घाऊक खरेदी बेकायदेशीर ठरवता येणार नाही आणि त्यांना आपल्या मालमत्तेचे दर ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

ही बातमी वाचा:

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना