Sangita Shinde WhatsApp Status: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळत आहे. मतमोजणी प्रक्रियेत प्रामुख्याने तिरंगी लढत ठरलेल्या या सामन्यात शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांनी (9.30 वाजतापर्यंत आलेल्या आकडेवाडीनुसार) 8796 हजार मत मिळवत आपली आघाडी कायम ठेवली आहे. तर सरनाईकांपुढे काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांनी आव्हान उभं करत त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे हे तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे.

एकीकडे मतमोजणीची रणधुमाळी सुरु असताना भाजप बंडखोर उमेदवार आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांचंव्हॉट्सअप स्टेटस चर्चेत (WhatsApp Status) आलं आहे. 'आदरणीय गुरुजन धन्यवाद, आज खूप आनंद झाला, मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिले..' असा आशयाचं व्हॉट्सअप स्टेटस संगीता शिंदे (Sangita Shinde) यांनी ठेवलं आहे. त्यामुळे या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे. (Amravati Teacher Constituency Election Result 2026)

Amravati Politics: आधी पक्षातून हकालपट्टी, बंडखोर करत निवडणूक कायम, आता अवघे 2112 मतं

भाजपच्या नेत्या सांगिता शिंदे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. अमरावती शिक्षक मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे किरण सरनाईक यांच्या विरोधात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. यामुळे भारतीय जनता पक्षाने शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांची हकालपट्टी केली होती. असे असताना सांगिता शिंदे यांनी निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्धार केला होता.

विशेष हे दोघेही बंडखोर उमेदवार भाजपच्या नेत्यांचे सख्खे नातेवाईक आहेत. शेखर भोयर हे तीवसा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे आहेत. तर संगीता शिंदे या भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. अशातच अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी संगीता शिंदे (बोंडे) यांच्या पारड्यात केवळ 2112 मते टाकली आहे. परिणामी अपेक्षेप्रमाणे मतं न मिळाल्याने संगीता शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच नाराजीमधून त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचे बोललं जात आहे.

अमरावती शिक्षक निवडणूक अपडेट (Amravati Teacher Constituency Election Result 2026)

19 व्या बाद फेरीनंतर उमेदवारांची मतं

किरण सरनाईक - 9168
अदिती पोहरे - 5508
श्रीकांत देशपांडे - 5202

महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 3660 मतांनी आघाडीवर