Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: स्वतःचा जीव देण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकुलत्या एक मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाल्याची काळजाचा ठोका चुकवणारी घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडली. या दुर्दैवी घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर घाटी रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर कुणालच्या आत्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांची छाती दडपून टाकणारा होता.

'दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’ (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

मृत मुरलीधर चांदवडे यांना तीन बहिणी आहेत. पाच महिन्यांपूर्वी एका भाच्याच्या लग्नात काही कारणांमुळे त्यांना सहभागी होता आले नव्हते. परिणामी, भाऊ आणि बहिणींची भेट होऊ शकली नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्यांची एक बहीण आणि भाच्याला भेटण्याबाबत चर्चाही झाली होती. मात्र, भेटीआधीच शुक्रवारी एकाच वेळी भाऊ, भावजय आणि एकुलत्या एक भाच्याच्या मृत्यूची बातमी धडकली. घाटी रुग्णालयात भावाचा मृतदेह पाहताच बहिणीला अश्रू अनावर झाले. "दादा, दहा दिवसांवर आलेल्या पौर्णिमेला राखीसाठी कोणाला कॉल करू रे?" या तिच्या आकांताने आणि आर्त हाकेने संपूर्ण घाटी परिसर सुन्न झाला होता आणि तेथे जमलेल्या उपस्थितांचेही डोळे पाणावले.

आई आणि लेकाचा काळीज चिरणारा शेवटचा संवाद (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

दरम्यान, वडिलांशी झालेल्या वादानंतर कुणाल सकाळी 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला होता. तो टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे समजताच आई-वडील, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक त्याला वाचवण्यासाठी गेले. सुमारे तीन तास त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू होते.

आईने कुणालला खाली उतरवण्यासाठी जिवाच्या आकांताने विनवणी केली. "तुझा पप्पांसोबत वाद आहे ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस," अशी आर्त हाक आई देत होती. मात्र हताश झालेल्या कुणालने "आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचे सोल्यूशनच नाही," असे म्हणत उडी मारली.

वडिलांचा वाचवण्याचा प्रयत्न आणि तिघांचा दुर्दैवी अंत (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain)

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि आई कुणालचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गर्दीतून अचानक पुढे आलेल्या वडिलांनी मुलाला पकडून मागे ओढण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत तोल गेल्याने मुलगा आणि वडील दोघेही डोंगरावरून खाली कोसळले. डोळ्यांदेखत पती आणि मुलाला खाली पडताना पाहून आई संगीता यांनीही तात्काळ डोंगरावरून उडी घेतली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मंगळसूत्र काढून फेकते, वडिलांना सोडते; डोंगरावरुन पडून मृत्यू होण्याआधी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद, नेमकं काय घडलं?