Chhatrapati Sambhajinagar: उपचाराच्या खर्चावरून सासरच्यांचा आडमुठेपणा भोवला आणि छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला तिचा जीव गमवावा लागला. तिच्या पोटातलं बाळही दगावलं. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. गरोदर लेकीच्या मृत्युमुळे तिच्या आईचा आक्रोश अंगावर काटा आणणारा आहे. मन सुन्न करून टाकणाऱ्या या घटनेनंतर एक धक्कादायक बाब समोर येत आहे. सासरची मंडळी माहेरून पैसे आणण्यासाठी स्वातीकडे वारंवार तगादा लावायचे. मूल होत नसल्यामुळे आधी तिचा छळ झाला, गरोदर राहिल्यानंतर उपचाराचा खर्च पुरवण्यासाठीही सासरच्या मंडळींनी हात झटकले. शेवटी उपचाराविना मुलीचा जीव गमावल्याचा आरोप मृत स्वातीचे वडील सदाशिव देशमुख यांनी केलाय.

सासरच्यांकडून वारंवार पैशाचा तगादा, मानसिक छळ; वडिलांचा आरोप

मृत स्वाती निंबाळकरचं 20 मार्च 2021 रोजी विशाल निंबाळकरसोबत थाटामाटात लग्न लागलं होतं. लग्नावेळी स्वातीच्या सासरच्या मंडळींनी सहा तोळे सोन्याची मागणी केली होती. त्यावेळी स्वातीचे वडील सदाशिव देशमुख यांनी चार तोळे सोनं दिलं होतं. नंतर धोंड्याच्या महिन्यात स्वातीच्या नवऱ्याला पाच ग्रॅमची अंगठी केली होती. तरीही स्वातीच्या सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशाची मागणी होऊ लागली. तिच्यामागे माहेरून पैसे आण असा तगादा सुरू केला. मूल होत नाही या कारणावरून स्वातीचा मानसिक छळ केला जात होता. स्वातीचे सासू-सासरे आणि नणंद यांनी स्वातीचा मानसिक आणि शारीरिक छळही केल्याचा आरोप गर्भवती असताना मृत झालेल्या स्वातीच्या वडिलांनी केलाय.

गरोदर राहिल्यानंतर स्वातीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींना दवाखान्यासाठी लागणारा खर्च पुरवला. तुझ्यावर काय उपचार झाले, त्यासाठी 80 ते 9o हजार रुपये दिल्याचंही ते म्हणाले. गरोदर राहिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिला दवाखान्यात नेणे टाळले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर जेव्हा घाटी रुग्णालयात तिला नेण्यात आले. त्यावेळी उपचारापूर्वीच तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या (सर्व रा. विहामांडवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पैठणसह संपूर्ण संभाजीनगर जिल्हा सुन्न झाला आहे. या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.