Devendra Fadnavis: नागपूरमधील (Nagpur) बुट्टीबोरी औद्योगिक वसाहतीतील 'आवाडा ग्रुप' कॅम्पसमध्ये आयोजित उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलखुलास मुलाखत दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशासकीय कामे, कौटुंबिक पाठबळ, मित्रपरिवार, समृद्धी महामार्गाचा प्रवास आणि विरोधकांचे टीकास्त्र यावर मोकळेपणाने भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारमध्ये सगळे चांगले चालले असते असे नाही, आम्ही फीडबॅक घेत असतो. मला दिवसभर भेटणारे लोक, राज्यात उद्योग सुरू करणारे उद्योजक आणि माझ्या परिवारात बायको आणि मुलगी हे कायम काम करण्यासाठी ऊर्जा देत असतात. नागपुरात आम्ही लोक घरांचा पत्ता विचारत नाही, कोण कोणाच्या घराजवळ राहतो असे आम्ही पत्ता सांगतो. माझे अनेक मित्र असे आहेत की त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्री नाही. अनेक लोक मला सांगत असतात की हे बरोबर नाही, असे ते सांगतात. अनेकदा लोक मोठ्या पदावर गेल्यावर ते स्वतःबद्दल चुकीचे काही ऐकण्याची तयारी ठेवत नाहीत, पण मी सर्व ऐकण्याची तयारी ठेवतो. आपल्या चुकीच्या गोष्टीही लोकांनी आपल्याला सांगितल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.

Devendra Fadnavis: तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरेंनी विरोध केला

पुढे बोलताना महायुतीच्या समन्वयावर आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर प्रकाश टाकत ते म्हणाले की, आपले महायुतीचे सरकार आहे, आपण जर पूर्ण मनाने एखादे काम केले तर सहयोगी पक्ष मदतीला येतात. मी समृद्धी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सहयोगी पक्षांनी मला सहयोग केला आणि ते माझ्यासोबत कायम राहिले. पण शरद पवार (Sharad Pawar) यांनी तेव्हा विरोध केला, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील विरोध केला, जेव्हा की ते आमच्या महायुतीचा भाग होते. पण मी माझ्या ध्येयाला धरून काम करत राहिलो आणि आज समृद्धी महामार्ग तयार झाला आहे. एका वर्षात आम्ही जमिनी अधिग्रहित केल्या, जे लोक विरोधात बोलायचे ते आज या प्रकल्पाचे गुणगान गात आहेत आणि त्यामुळे सगळ्या विरोधकांचे तोंड बंद झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: माझी चाल कासवाची नाही मात्र माझी प्रेरणा कासव

टीकाकारांना उत्तर देताना स्वतःच्या कार्यशैलीबद्दल त्यांनी सांगितले की, माझी चाल कासवाची नाही मात्र माझी प्रेरणा कासव आहे, जे माझ्यावर टीका करतात, दगड फेकतात तेव्हा मी कासवाप्रमाणे शेलमध्ये जातो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो व आपले काम करत असतो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा

Yogi Adityanath: पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...