Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एबीपी माझाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा, स्वतःच्या आयुष्यातील मागील काही वर्षांचा काळ, व्यायामाचा व्हिडीओ आणि भविष्यातील भूमिकेबाबत विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी आपण शांत राहिलो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याचे सांगत, “शांत राहणं एक काळापर्यंत ठीक आहे. पण हा माझा स्वभाव नाहीये,” असं म्हटलं.

Dhananjay Munde: बाप्पाकडे काय मागितलं?

धनंजय मुंडे यांनी बाप्पाकडे काय मागितलं, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “विघ्न हर्त्याकडे मी एकच मागणी केली की, आज जे काही दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे ते संकट विघ्नहर्त्याने शेतकऱ्यांचं दूर करावं. खरं तर आज इतर सर्व गोष्टींसोबत जसं दुष्काळाच्या या झळा शेतकरी सहन करतोय, यातून गणरायाने फार मोठी शक्ती शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी करावी.”

पुढे ते म्हणाले, “त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मी गणरायाकडे मागितली की, या महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक सलोखा पूर्णपणाने मोडला गेलेला आहे, जो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये 18 पगड जाती धर्मांचा एक गावगाडा केला होता आणि त्यात ते गुण्यागोविंदाने आजपर्यंत राहत होते. पण, मागच्या दोन वर्षांपासून जो या महाराष्ट्रामध्ये सामाजिक बदल झालेला आहे, तो सामाजिक सलोखा पुन्हा निर्माण व्हावा आणि ते गणरायांनी करावं, हे एक साकडं मी गणरायाकडे घातलं आहे,” असे त्यांनी म्हटले.

Dhananjay Munde: स्वतःसाठी बाप्पाकडे काही मागितलं का?

स्वतःसाठी बाप्पाकडे काही मागितलं का? तुमच्यासाठी कोणी प्रार्थना करतंय का, असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “माझ्यासाठी कोण प्रार्थना करतंय माहीत नाही? पण कदाचित असंख्य असे सहकारी आहेत ज्यांनी मला जीव लावला. ज्यांना मी आज पाहिलं सुद्धा नाही, असे अनेक जण खंबीरपणाने माझ्या अति वाईट प्रसंगामध्ये सोबत राहिले, कदाचित ते माझ्यासाठी काही मागत असतील. पण मी आता गणरायाकडे माझ्या स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. त्यामुळं जे काही आपण गणरायाकडे मागतो, ते आपल्या सर्व सहकारी, शेतकरी आता जो संकटात आहे त्याच्यासाठीच, बाकी दुसरं नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Dhananjay Munde: जिममधील व्हिडीओवर म्हणाले, ‘मसल पॉवर दाखवणं नाही’

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून नेमका कोणता संदेश द्यायचा होता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या व्यायामाच्या आवडीबाबत सांगितलं. धनंजय मुंडे म्हणाले, “राजकारणामध्ये मसल पॉवर म्हणलं की त्याचा अर्थ फार वेगळा निघतो. पण लहानपणापासूनच मला व्यायामाची फार मोठी आवड आहे. आता अशात मुख्यतः वेळ मिळतोय. आपण आपल्या शरीराकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मधल्या काळात अनेक आजारातून मी बाहेर पडलो.”

ते पुढे म्हणाले, “प्रॉपर जिम करणं आणि पूर्वी जिम केलेली असल्यामुळे लगेच मसल मेमरी पकडते. त्यामुळे माझा ट्रेनर आणि जिममधले काही सहकारी जे मला व्यायाम करत असताना पाहत होते, त्यांचं असं म्हणणं होतं की, तुम्ही एवढं करताय आणि परिणाम पण तुमच्या शरीरसृष्टीमध्ये दिसतोय, तर तुम्ही हे बाहेर पण दाखवलं गेलं पाहिजे. त्याच्यातून अनेक जण इन्स्पायर होतील. काही जण जे व्यायाम करत नाहीत, ते व्यायामाला सुरुवात करतील, अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या. म्हणून त्या गोष्टीची पोस्ट मी टाकली; पण त्याचा अर्थ कुठं बाकी मसल पॉवर दाखवणं नाही.”

Dhananjay Munde: मी शांत राहिलो, त्याचा परिणाम माझ्या शरीरावर झाला

गेल्या एक-दीड वर्षात बरंच काही घडलं. काही वेळा तुम्ही व्यक्त झाला आणि अनेक वेळा झाला नाहीत. या काळाबाबत तुमचं काय रिअलायझेशन आहे? तुम्हाला काही रिग्रेट वाटतो का? असं विचारलं असता धनंजय मुंडे यांनी आपल्या शांत राहण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. ते म्हणाले, “माझ्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने कसलंही कारण नसताना, ज्यात माझा काही संबंध नसताना माझ्या विरोधात 252 दिवस सलग मीडिया ट्रायल केलं, त्यावेळेस असं वाटत होतं की, मी शांत राहिलो. मला व्यक्त न होण्याचं सांगितलं. त्याच्यामुळे परिणाम हा झाला की, माझा व्यक्त होणारा स्वभाव आहे. माझा संघर्ष करणे हा स्वभाव आहे. जशाला तसं उत्तर देणे हा स्वभाव आहे, ते न करता मी शांत बसलो. त्याचा परिणाम माझ्या शरीरावरती झाला. त्या बाबतीत मला असं वाटतं की, हे माझ्याकडून चुकलं. आपण त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं.”

Dhananjay Munde: ‘शांत राहणं एक काळापर्यंत ठीक आहे, पण...’

आता यापुढे तरी तुम्ही शांत राहणार नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी आगामी काळातील आपल्या भूमिकेबाबत सूचक भाष्य केलं. धनंजय मुंडे म्हणाले, “एक लक्षात घ्या, शांत राहायचं तर काही मर्यादेपर्यंत शांत राहावं लागतं. एक वेळ असते, त्या वेळेची आपण वाट पाहत असतो, तोपर्यंत मी शांत राहिलोय. शांत राहणं एक काळापर्यंत ठीक आहे. पण हा माझा स्वभाव नाहीये. स्वभावाच्या विरोधात गेलो, त्याचा परिणाम शारीरिक फार झाला. आता शांत राहणं, न राहणं हे येणाऱ्या काळात आपल्याच स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी बोलेल. त्यावेळेस लक्षात येईल की मी पुढे शांत राहणार आहे का? की व्यक्त होणार आहे,” असे देखील त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडेंना न्यायालयाचा दणका; 300 रुपयांचा दंड ठोठावला, नेमकं प्रकरण काय?