Dharashiv FDA Action: धाराशिव जिल्ह्यातील खव्याची मोठी आणि प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळ्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. भेसळीचा संशय असलेला तब्बल 325 किलो खवा जप्त करण्यात आला आहे. या खव्याची किंमत 74 हजार 750 रुपये असल्याची माहिती आहे. दोन खवा विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे. त्याचाच भाग म्हणून येरमाळ्यात ही कारवाई करण्यात आली. (Khoya Seized)

धाराशिवमध्ये येरमाळा आणि सरमकुंडी या दोन खव्याच्या मोठ्या आणि प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. या भागात दररोज सुमारे 9 ते 10 हजार टन खवा तयार होतो.

325 किलो खवा ताब्यात

येरमाळा परिसरातील दोन खवा विक्रेत्यांकडून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 325 किलो खवा जप्त केला. या साठ्याची किंमत 74 हजार 750 रुपये आहे. खव्यामध्ये भेसळ असल्याचा संशय प्रशासनाला आहे. त्यामुळे खव्याचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल येईपर्यंत जप्त केलेल्या खव्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालातून खव्यामध्ये भेसळ असल्याचं स्पष्ट झाल्यास संबंधित विक्रेत्यांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नवरात्र आणि दिवाळीच्या काळात मिठाई आणि खवा यांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू आहे. FDA च्या या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाण्याची शक्यता आहे.