Ganesh Chaturthi 2026: सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी दीड दिवस, पाच किंवा सात दिवसांच्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनही करण्यात आले आहे, मात्र कमी पावसामुळे विदर्भ, मराठवाड्यासह अहिल्यानगरचा भाग सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. पावसाने ओढ दिल्याने जलस्रोत आटत चाललेत आणि आता त्याची झळ थेट गणेश विसर्जनालाही बसण्याची शक्यता आहे... कारण विघ्नहर्त्या गणरायाच्या विसर्जनासाठीच पाणी नसेल, तर काय करायचं? याच प्रश्नातून अकोल्यात एक अनोखा पर्याय पुढे आलाय. तो म्हणजे गणेशमूर्ती विसर्जित न करता पुढच्या वर्षापर्यंत जतन करण्याचा! अकोल्यातील काही मंडळांनी यंदा हा निर्णय घेतलाय. तर अकोल्यातील मोमीनपुरा येथील विश्वकर्मा गणेश मंडळ तब्बल 38 वर्षांपासून ही परंपरा जपतंय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता मूर्ती जतन करण्याचा हा ‘अकोला पॅटर्न’ नेमका काय आहे? जाणून घ्या...

विदर्भ, मराठवाड्यात पाणीटंचाईची झळ गणेशोत्सवालाही...(Ganesh Visarjan 2026)

पावसाची प्रतीक्षा करता करता यंदा आभाळानेच पाठ फिरवली. शेतशिवारांपासून जलस्रोतांपर्यंत दुष्काळाची चाहूल स्पष्ट दिसू लागलीय. त्यात आता पाणीटंचाईची झळ गणेशोत्सवालाही बसण्याची शक्यता निर्माण झालीये. अकोल्यातील गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या प्रमुख जलस्रोतांमध्ये केले जात आहे, त्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीसह बाळापूर परिसरातील मन आणि महेश नदीमध्येही पाणीसाठा कमी आहे. विशेषतः मोठ्या आणि उंच गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा कसे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गणेशभक्तीची परंपरा कायम ठेवत पाण्याची बचत करण्याचा एक वेगळा विचार अकोल्यात आकार घेतोय...

एकीकडे दुष्काळाची गंभीर परिस्थिती, तर दुसरीकडे गणेशोत्सवाची शेकडो वर्षांची श्रद्धा...

यंदा गणरायाला निरोप देण्यासाठी पाण्याचा वापर करण्याऐवजी गणरायाचीच जपणूक करण्याचा पर्याय काही मंडळांनी स्वीकारलाय. अकोला जिल्ह्यात लहान-मोठी मिळून तब्बल 1 हजार 984 गणेश मंडळे आहेयेत. या मंडळांपैकी काही मंडळांनी यंदा मूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे दुष्काळाची गंभीर परिस्थिती, तर दुसरीकडे गणेशोत्सवाची शेकडो वर्षांची श्रद्धा, या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून केला जातोय. मूर्तीचे विसर्जन न करता तिची वर्षभर काळजी घ्यायची... पुढच्या वर्षी पुन्हा रंगरंगोटी करायची... आणि त्याच मूर्तीची नव्याने प्रतिष्ठापना करायची... असा हा पर्याय आहेय.

तब्बल 38 वर्षांपासून बाप्पाचं विसर्जन न करण्याची परंपरा...

अकोल्यासाठी मूर्तीचे जतन हा काही आजचा विचार नाही. अकोल्याच्या मोमीनपुरा भागातील विश्वकर्मा गणेश मंडळाने तब्बल 38 वर्षांपासून मूर्ती विसर्जित न करण्याचा पायंडा जपलाय. दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी तिची काळजीपूर्वक जपणूक केली जाते. वर्षभर मूर्ती सुरक्षित ठेवली जात आहे आणि पुढच्या वर्षी त्याच मूर्तीला नव्याने रंगरंगोटी करून पुन्हा गणरायाची प्रतिष्ठापना केली जातेय. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत या 38 वर्षांच्या परंपरेचा संदर्भ देत विश्वकर्मा गणेश मंडळाने अकोल्यातील इतर गणेश मंडळांनाही मूर्ती जतन करण्याचे आवाहन केलेय. आणि आता या एका मंडळाच्या जुन्या परंपरेला यंदाच्या दुष्काळाची नवी संदर्भभूमी मिळाली आहे. कारण गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असला तरी यंदा मात्र पाणीस्थितीची गंभीरता लक्षात घेता प्रशासनानेही मंडळांना परिस्थितीचा विचार करण्याचे आवाहन केलेय.

श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा एक पर्याय...

दुष्काळाच्या संकटात प्रत्येक थेंबाचं महत्त्व वाढलंय. अशा वेळी विसर्जनाऐवजी जतन करण्याचा विचार केवळ एका गणेशमूर्तीपुरता मर्यादित राहत नाही... तर तो श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा एक पर्याय ठरतोय. मात्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना गणरायाला विसर्जित करण्याऐवजी जपण्याचा संदेश देणारा अकोल्याचा हा प्रयोग आता हळूहळू चळवळीचं रूप घेतोय.

हेही वाचा :

बाप्पाला विसर्जनावेळी 'शिदोरी' का बांधून देतात? शिदोरीत नक्की काय असते? हे बंधनकारक असते का? धार्मिक महत्त्व, परंपरा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)