Jalgaon Crime News: रक्षाबंधन (Raksha Bandhan) सणाच्या दिवशीच जळगावमध्ये एक हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. 'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो' असा भावनिक मेसेज सोशल मीडियावर (Social Media) बहिणीला पाठवून एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. रोहित साहेबराव धनगर असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेने जळगावात मोठी खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime News: राखी बांधून आला अन् उचलले टोकाचे पाऊल

रोहित हा अकरावीत कला शाखेत शिकत होता. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो आपल्या वडिलांसोबत आत्याच्या घरी गेला होता. तिथे मोठ्या उत्साहात बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तो वडिलांची दुचाकी घेऊन जुना आसोदा रोड परिसरातील स्वतःच्या घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) बहिणीसोबतचा फोटो अपलोड करत 'हॅपी रक्षा बंधन ताई... सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो' असा भावनिक संदेश लिहिला.

Jalgaon Crime News: "अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा"

रोहितने आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर आणखी एक भावूक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने लिहिले होते की, "अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा, जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आखे नम होगी ना दिल मे कोई गम लेके आऊंगा! शुक्रिया..." याशिवाय, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याचे सांगणारा एक व्हिडिओ त्याने आपल्या मित्राला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

Jalgaon Crime News: मित्रांनी धाव घेतली, पण उशीर झाला होता

रोहितचे हे मेसेज आणि स्टेटस पाहताच त्याच्या मित्रांच्या पायाखालची वाळू सरकली. मित्रांनी तातडीने त्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत रोहितने घरात गळफास घेतला होता. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रक्षाबंधनासारख्या आनंदाच्या दिवशीच ऐन उमेदीच्या मुलाने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Samrudhi Mahamarg Robbery : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, टायर पंक्चर केले, मध्यरात्री गाडी अडवली; भयंकर घटना डॅश कॅमेऱ्यात झाली कैद