Kajalkath Yamini Dalvi: 'काजळकाठ' (Kajalkath) कवितासंग्रहाला मराठवाडा साहित्य परिषदेचा (Marathwada Sahitya Parishad) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा कवितासंग्रह एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवी यांनी लिहेला आहे. तुळजापूरमध्ये जागर साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूरच्या वतीने जागर साहित्य पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यात प्रा.डॉ.शेषराव मोहिते, प्रा.सुरेश आडके, यामिनी दळवी यांना जागर साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात तुळजाई सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं विशेष मराठी वाङ्मय जागर पुरस्कार 'अधले मधले दिवस' या ललितगद्य साहित्यकृतीसाठी प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र खंडेराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ पद्य लेखनासाठीचा जागर साहित्य पुरस्कार 'काजळकाठ' या कवितासंग्रहासाठी यामिनी दळवी यांना, तर शिक्षणमहर्षी रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ गद्य लेखनासाठीचा जागर साहित्य पुरस्कार 'सुकाणू' या कादंबरीसाठी प्रा.सुरेश आडके यांना गौरवण्यात आलं आहे.

ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीनं 24 मे 2026 रोजी यामिनी दळवी यांच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला. या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गजलनवाज भीमराव पांचाळे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आणि क्रांतिकारी शेतकरी चळवळीचे नेते रविकांत तुपकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि विश्वस्त डॉ. लतिका भानूशाली उपस्थित होते.

ताकदीचं लिखाण करणारी एक महत्वाची कवयित्री

नीरजा, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार यांच्या ताकदीचं लिखाण करणारी आजच्या पिढीतील एक महत्वाची कवयित्री म्हणून ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवारांनी यामिनी दळवींच्या कवितांवर भाष्य केलेलं. डॉ. सलील कुलकर्णी यांनी यामिनीच्या कवितांचा प्रवास आणि त्यातल्या जाणिवांवर भाष्य करताना ओघवता आणि मार्मिक संवाद साधून उपस्थितांची मनं जिकलेली. तर गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी शुभेच्छा देताना यामिनीच्या गजलेचंच सादरीकरण केलेलं, ज्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.