Maharashtra Drought: राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामावर संकट निर्माण झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, बाजरी यांसारख्या पिकांवर पावसाअभावी परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेतला जात असून, केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात कोणत्या उपाययोजनांची मागणी करायची, याबाबतचा आराखडा तयार केला जात आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाड्यासह विविध भागांचा पाहणी दौरा केला असून, त्यांच्या निरीक्षणांसोबत मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीचा आधार घेऊन पुढील प्रस्ताव तयार होणार आहे.

सध्या राज्यात अधिकृतपणे कोणत्याही जिल्ह्यात किंवा तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. मात्र, अनेक भागांतील पावसाचा खंड, पिकांची स्थिती, पाणी उपलब्धता आणि चाऱ्याची परिस्थिती यांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 सप्टेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन 5 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Maharashtra Drought: मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड

मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. अलीकडील अधिकृत अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मराठवाड्यातील उभ्या पिकांपैकी सुमारे 25 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला असून कापूस, मका आणि तुरीची स्थितीही खराब असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री भरणे यांनी नांदेडमध्ये बैठक घेतली होती. पिकांची स्थिती, पाणी उपलब्धता, चारा आणि पशुधनासमोरील अडचणी यांचा आढावा घेण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी आणि पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यातील दुष्काळाचा प्राथमिक अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठवाडा, विदर्भासह अनेक भागाचा दौरा केला आहे. त्यांच्या निरीक्षणावरून केंद्राकडे पाठवण्यात येणारा प्रस्ताव तयार होणार आहे.

Dattatray Bharne: कृषीमंत्री भरणे यांच्या अहवालात संभाव्य मुद्दे

1. दुष्काळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची माहिती सादर करणे: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील काही तालुक्यात पाऊस कमी पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

2. पंचनामे ५ ऑक्टोबरपर्यंत: सध्या ई-पंचनामा सुरू आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत अंतिम आकडेवारी येईल. तोपर्यंत प्राथमिक अहवालात 'तुटीच्या पावसाची' नोंद.

3. केंद्राकडे जाणाऱ्या प्रस्तावात या बाबी असतील:

NDRF च्या निकषानुसार मदत: प्रति हेक्टरी 8500 ते 22500 रुपयांपर्यंत मदतीची मागणी
पीकविमा कंपन्यांना तातडीने 25% अग्रीम रक्कम देण्याचे निर्देश
चारा छावण्या, टँकर आणि मनरेगाची कामे वाढवण्याची मागणी
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत:* शैक्षणिक फी माफी आणि वसतिगृह अनुदान

4. सरकारची भूमिका

मंगळवारच्या बैठकीत कृषीमंत्री भरणे यांचा दौरा अहवाल आणि मदत व पुनर्वसन विभागाचा प्राथमिक अंदाज एकत्र करून अंतिम मसुदा तयार होईल आणि तोच दिल्लीला पाठवला जाईल.

Maharashtra Drought: 1972 च्या दुष्काळाची आठवण; यंदाची परिस्थिती वेगळी का?

मराठवाड्यातील सध्याच्या परिस्थितीची तुलना 1972 च्या दुष्काळाशी केली जात आहे. त्या काळातील दुष्काळ अनुभवलेल्या ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या मते, त्यावेळी पाऊस कमी असल्याने पेरण्या उशिरा झाल्या होत्या. मात्र, आज शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मशागत आणि फवारणी यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे पीक वाया गेल्यास त्याचा आर्थिक फटका अधिक तीव्रतेने जाणवतो.

नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यासह अनेक भागांतही शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे चिंता व्यक्त केली आहे. मका, बाजरी, सोयाबीन, मूग, मठ आणि कपाशी यांसारखी पिके दाणा भरण्याच्या अवस्थेतच करपल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. जोरदार पाऊस झाला तरी काही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी उपलब्ध चारा काही काळापुरता पुरेल, मात्र पुढील काळात चारा आणि पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Jayant Patil: जयंत पाटील यांचीही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केल्याचा दाखला देत महाराष्ट्र सरकारनेही तांत्रिक बाबींची प्रतीक्षा न करता पुढाकार घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, याच मागणीसाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

शरद पवार यांनी 18 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात दुष्काळसदृश तालुक्यांना सवलती लागू करण्यासोबत शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी, पीकविमा, रोजगार हमीची विशेष कामे, टँकर, चारा छावण्या, पशुधनासाठी पाणी, वीज व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कमाफी अशा विविध उपाययोजनांची मागणी केली आहे.

आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाहणी दौऱ्याचा अहवाल, कृषी विभागाची प्राथमिक आकडेवारी आणि मदत व पुनर्वसन विभागाचा अंदाज यांचा एकत्रित विचार करून पुढील आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नुकसान आणि आवश्यक मदतीचा तपशील असलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार केंद्राकडे नेमकी किती मदत मागते आणि दुष्काळ जाहीर करण्याबाबत 5 ऑक्टोबरपर्यंत काय निर्णय घेतला जातो, याकडे शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Monsoon Rain Update: दुष्काळात तेरावा महिना! मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; देशात 15 टक्के पावसाची तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज