मुंबई : दोन वर्षे दिवसरात्र अभ्यास केला, परीक्षेची पूर्ण तयारी केली, मात्र आता प्रत्यक्ष बारावीचा परीक्षा अर्ज भरण्याची वेळ आली असताना राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ऑनलाईन नोंदणीअभावी राज्यातील तब्बल 18,534 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकरावीत ऑनलाईनऐवजी ऑफलाईन प्रवेश दिल्यामुळे या विद्यार्थ्यांची नोंद UDISE प्रणालीमध्ये झालीच नाही आणि आता याच तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांना बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यापासून रोखले जात आहे.

राज्यातील एकूण 8 विभागांमधील 1,218 कनिष्ठ महाविद्यालयांनी हे बेकायदेशीर ऑफलाईन प्रवेश दिल्याचे उघडकीस आले आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर विभागातील 177 महाविद्यालयांमधील 1,718 विद्यार्थी या गोंधळात अडकले आहेत. UDISE+ ही शालेय शिक्षणाची संपूर्ण डिजिटल माहिती संकलित करणारी केंद्र सरकारची प्रणाली आहे, परंतु प्रशासकीय नाकर्तेपणामुळे हा प्रश्न आता थेट विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर बेतला आहे.

HSC Exam Registration Issue : विभागनिहाय बाधित महाविद्यालये अन् विद्यार्थ्यांची आकडेवारी

शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बसला आहे. विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे,

1. अमरावती विभाग: 124 महाविद्यालये | 1,137 विद्यार्थी

2. छत्रपती संभाजीनगर विभाग: 175 महाविद्यालये | 1,718 विद्यार्थी

3. कोल्हापूर विभाग: 170 महाविद्यालये | 1,611 विद्यार्थी

4. लातूर विभाग: 83 महाविद्यालये | 846 विद्यार्थी

5. मुंबई विभाग: 193 महाविद्यालये | 6,478 विद्यार्थी (सर्वाधिक)

6. नागपूर विभाग: 178 महाविद्यालये | 1,945 विद्यार्थी

7. नाशिक विभाग: 118 महाविद्यालये | 2,206 विद्यार्थी

8. पुणे विभाग: 177 महाविद्यालये | 2,593 विद्यार्थी

एकूण महाराष्ट्र: 1,218 कनिष्ठ महाविद्यालये | 18,534 विद्यार्थी

Maharashtra Education Department : 'एबीपी माझा'चे थेट सवाल

गेल्या वर्षापासून अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे स्पष्ट आदेश असताना महाविद्यालयांनी ऑफलाईन प्रवेश नेमके का दिले? हा संपूर्ण गोंधळ उडालेला असताना 'एबीपी माझा'ने शिक्षण विभाग आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना काही थेट सवाल विचारले आहेत:

- अकरावीला प्रवेश देताना महाविद्यालयांना आणि शिक्षण विभागाला नियमांची आठवण झाली नाही का?

- विद्यार्थ्यांनी दोन वर्षे शिक्षण घेतले, मग आता बारावीचा अर्ज भरताना त्यांची नोंदच नाही, असे सांगून पळ काढणे योग्य आहे का?

- जर चूक महाविद्यालयांची असेल तर शिक्षण विभाग नेमके कुठे झोपले होते?

- प्रशासकीय आणि तांत्रिक त्रुटी सरकारच्या यंत्रणेत असतील, तर त्याची शिक्षा निष्पाप विद्यार्थ्यांनी का भोगायची?

- अधिकाऱ्यांच्या आणि संस्थाचालकांच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे, याची जबाबदारी नक्की कोण घेणार?

ही बातमी वाचा:

Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक