मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सकाळी 8:00 वाजल्यापासून सुरुवात होत आहे. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अनेक ठिकाणी मित्रपक्षांमधील मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि अपक्षांच्या आव्हानामुळे राजकीय समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची झाली असून मतमोजणीच्या निकालांचा सस्पेन्स आता शिगेला पोहोचला आहे.

Vidhan Parishad Voting Percentage : विक्रमी मतदान अन् मतमोजणीची ठिकाणे

शुक्रवारी (23 ऑक्टोबर) पार पडलेल्या मतदानात विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाने मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे:

नागपूर पदवीधर: 64.76% मतदान (38 उमेदवार)
मतमोजणी: मानकापूर क्रीडा संकुल, नागपूर.

अमरावती शिक्षक: विक्रमी 91.08% मतदान (सुमारे 33 हजार मतदार)
मतमोजणी: लोकशाही भवन, अमरावती.

पुणे पदवीधर व शिक्षक: पदवीधर 62.78%, तर शिक्षक 85.87% मतदान (2020 च्या तुलनेत वाढ)
मतमोजणी: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर: 58.67% मतदान
मतमोजणी: एमआयडीसी, चिकलठाणा.

Mahayuti vs MVA Seat Battle : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

हा निकाल केवळ 5 जागांपुरता मर्यादित नसून आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि महायुतीचे सुधाकर कोहळे यांच्यात येथे मुख्य लढत आहे. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

पुणे आणि अमरावतीमध्ये मित्रपक्षांमधील अंतर्गत मतभेद, बंडखोरी आणि मैत्रीपूर्ण लढतींमुळे महायुती तसेच महाविकास आघाडीतील समन्वयाची मोठी परीक्षा होणार आहे.

Vidhan Parishad Election Significance : युती-आघाडीची एकजुटीची परीक्षा

या निवडणुकीत दोन्ही गटातून अनेक ठिकाणी बंडखोरीमुळे होणारी मतविभागणी कोणाचा गेम बिघडवणार आणि कोणाचा विजय सुकर करणार, याचे उत्तर मतपेटीतून मिळणार आहे. या निकालांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोणाची संघटनात्मक ताकद मजबूत आहे आणि कोणाला आत्मपरीक्षण करावे लागणार, हे स्पष्ट होईल.

ही बातमी वाचा:

Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार