Nagpur Graduates Vidhan Parishad Election Result 2026: विधान परिषद नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nagpur Graduates Vidhan Parishad Election Result 2026) काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjari) यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे (Sudhakar Kohle) यांना 63 हजार 960 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजित वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता 84 टेबलवरून मतमोजणीला सुरुवात झाली. 41 पेक्षा जास्त तासांपासून ही मतमोजणी सुरू होती. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विभागातील सर्व जिल्ह्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Nitesh Karale Nagpur)

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक 75 हजार 438 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख 65 हजार 906 मतांपैकी 15 हजार 32 मते अवैध ठरली. तर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक 67 हजार 231 मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 29 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी 27 ऑक्टोबर सकाळी 8 वाजता सुरू झाली. 41 तासांनंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे वेळापत्रक आयोगाने निश्चित केले आहे. (Nagpur Vidhan Parishad Election Result 2026)

विधान परिषदेच्या निकालानंतर रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडवर- (Ravindra Chavan Vidhan Parishad Election Result 2026)

नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत होते. नागपूर पदवीधरमध्ये शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळेंवर 3 हजार 271 मतांनी विजय मिळवला. विधान परिषदेतील मिळालेल्या पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष ॲक्शन मोडवर आले आहेत. नागपूर आणि पुण्यातील सर्व जिल्ह्यांचा रविंद्र चव्हाण लेखाजोखा घेणार आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष, आमदार आणि मंत्र्यांची झाडाझडती घेणार असल्याची माहिती आहे. तसेच रविंद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 2 नोव्हेंबरला भेट घेणार आहेत. यावेळी महायुतीच्या मित्र पक्षांनी घेतलेल्या भूमिकेबाबत रविंद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अहवाल देखील देणार आहेत. पराभवाचे संपूर्ण विश्लेषण रविंद्र चव्हाण हे अमित शाहांसमोर मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपचा पराभव का झाला?, याची दहा कारणं समोर आली आहेत.

नागपुरात भाजप का हरली?, 10 कारणं- (Why did the BJP lose in Nagpur? Lets know 10 reasons)

उमेदवार निश्चितीवेळीच नागपूर भाजपमध्ये उभी फूट

अनिल सोलेंचा गिरीश व्यासांच्या साथीने बंडाचा झेंडा, बंड शमले, पण डॅमेज होऊन गेले

भाजपच्या पारंपरिक मतदारांकडून मतदानात टाळाटाळ किंवा मत अवैध करुन रोष व्यक्त

निवडणूक व्यवस्थापन फसले, पहिल्या पसंतीची 4,291 जादा मिळवली, पण दुसऱ्या पसंतीचा विचार नाही

छोटे पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या दुसऱ्या,तिसऱ्या पसंतीची मतांकडे दुर्लक्ष

अभिजीत वंजारींनी अन्य उमेदवारांच्या संपर्कात राहून दुसऱ्या,तिसऱ्या पसंतीची मतं मागितली,तीच निर्णायक ठरली

नितेश कराळेंनी घेतलेली 24,249 मतांनी भाजप, काँग्रेसचं गणित बिघडलं

नितेश कराळेंना मागच्या तुलनेत मिळालेली साडे तीन पट मतं भाजपवरची नाराजी दाखवतात

नितेश कराळेंची दुसऱ्या पसंतीची मतं वंजारींना पडणं अखेर निर्णायक ठरलं

भाजपनं ब्राह्मण उमेदवार न दिल्यानं ब्राह्मण मतदारांत नाराजी दिसली, भाजप आणि संघ वर्तुळातील कुजबूज मतपेटीत

सुधाकर कोहळेंनी पराभवाचं कारण सांगितलं, नेमकं गणित कुठे चुकलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत...; विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट?