मुंबई : सांस्कृतिक आणि साहित्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन अत्यंत दिमाखदार आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या नांदी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. आगामी 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या विशेष नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनात आजच्या आधुनिक युगातील अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि साहित्य या विषयावर विविध चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला डोंबिवलीकर साहित्यप्रेमी, नागरिक आणि विशेषतः युवा वर्गाचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

"मायमराठी भाषा ही आपली अस्मिता, ओळख अन् अभिमान!"

नांदी संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. "मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे. हे नांदी संमेलन म्हणजे साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाला एकाच व्यासपीठावर जोडणारा एक अत्यंत प्रभावी संवादमंच आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.

मराठी साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपतानाच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

एआय आणि रोजगारावर मंथन

या संमेलनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे बदलणारे मानवी दैनंदिन जीवन, तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या करिअरच्या नव्या संधी आणि बदलणारे रोजगारविश्व यावर सखोल व महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात मराठी भाषा आणि साहित्याचे स्थान नेमके कुठे आहे आणि ते कसे अधिक मजबूत करता येईल, यावर उपस्थित मान्यवरांचे अभ्यासपूर्ण मंथन यशस्वीरीत्या पार पडले.

साहित्य व राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याला समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रसिद्ध साहित्यिक अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, माधव जोशी, प्रा. डॉ. विनय भोळे, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री साने उपस्थित होते.

यासोबतच डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले यांच्यासह साहित्य, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच हजारो रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी वाचा:

SIR : पंतप्रधान-मुख्यमंत्री कोण असावे हे घुसखोरांनी ठरवायचे का? SIR विरोधावरून रविंद्र चव्हाणांचा ठाकरे बंधूंवर घणाघात