<p>Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती</p>
<p>अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो उतरवायला लावल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप युवा मोर्चाकडून मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याची मोहीम आखली होती. मात्र, मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या घराभोवती तयार केलेल्या अभेद्य तटबंदीमुळे कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे घर तर सोडाच पण शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नव्हती. मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कृष्णराज महाडिक यांना माहीम परिसरातूनच ताब्यात घेतले होते. एकूणच हे आंदोलन फसल्याने कृष्णराज महाडिक यांनी स्वत:ची शोभा करुन घेतली होती. हे कमी होते की काय म्हणून आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कृष्णराज महाडिक यांचे कान टोचले आहेत. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर चव्हाणांनी नापसंती व्यक्त केली. </p>