मुंबई : मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास अतिशय जलद, आरामदायी आणि सुरक्षित व्हावा या उद्देशाने डिसेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला 701 किलोमीटरचा 'समृद्धी महामार्ग' (Samruddhi Mahamarg) आता नागरिकांसाठी भीतीचा मार्ग ठरत आहे. प्रवासाचा वेळ वाचवणाऱ्या या महामार्गावर गेल्या साडेतीन वर्षांत अपघातांचे भीषण सत्र सुरूच असून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

अतिवेग, चालकाला येणारा थकवा आणि नियमांचे उल्लंघन यामुळे या महामार्गावर होणाऱ्या प्राणघातक अपघातांची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक समोर आली आहे.

Samruddhi Highway Accident Statistics : साडेतीन वर्षांत 572 जणांचा दुर्दैवी मृत्यू

माहिती अधिकार आणि पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये तब्बल 572 जणांनी आपला जीव गमावला आहे.

2024 मधील स्थिती : 2024 या संपूर्ण वर्षात 137 अपघातांची नोंद झाली असून 126 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

2025 मधील आकडेवारी : 2025 मध्ये अपघातांची संख्या वाढून 185 वर पोहोचली आणि तब्बल 152 जणांचा मृत्यू झाला.

2026 मधील भयानक वास्तव : 2026 या वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या 8 महिन्यांत 142 अपघात झाले असून 128 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 8 महिन्यांतील हा मृतांचा आकडा 2024 च्या संपूर्ण वर्षातील मृतांपेक्षाही जास्त आहे.

Dhamangaon Railway Accident Bullana Bus Incident : धामणगाव अन् बुलढाण्यातील भीषण घटना ताज्या

नुकताच धामणगाव रेल्वेजवळ घडलेला अपघात याचे ताजे उदाहरण आहे. शेगाव येथून देवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने 7 जणांचा जागीच मृत्यू झाला.

यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे घडलेल्या बस अपघातात अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Highway Hypnosis And Lane Discipline : अपघातांची मुख्य कारणे कोणती?

तज्ज्ञ आणि विविध अहवालांनुसार केवळ चालकाची चूक हे अपघाताचे एकमेव कारण नसून इतरही अनेक तांत्रिक व मानसिक बाबी याला कारणीभूत आहेत,

हायवे हिप्नोसिस (Highway Hypnosis) : लांब आणि सरळ रस्त्यावर सतत एकाच वेगात गाडी चालवल्यामुळे चालकाची सतर्कता कमी होते आणि त्याला डुलकी येते.

लेन शिस्तीचा अभाव : अवजड वाहने (ट्रक, कंटेनर) अचानक लेन बदलतात किंवा रस्त्यावर उभी केली जातात, ज्यामुळे मागून वेगात येणाऱ्या वाहनांना ब्रेक दाबण्यासाठी वेळ मिळत नाही.

अतिवेग अन् थकवा : मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे आणि पुरेशी विश्रांती न घेता प्रवास करणे अपघातास निमंत्रण ठरत आहे.

Samruddhi ITMS System Demand : कागदावरील योजना की प्रत्यक्ष सुरक्षा?

शासनाकडून समृद्धी महामार्गावर 'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) बसवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ तंत्रज्ञान बसवून चालणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम अपघातांची संख्या कमी होण्यात दिसला पाहिजे.

प्रत्येक मोठ्या अपघातानंतर केवळ पंचनामे आणि मदतीच्या घोषणा करण्याऐवजी महामार्गाचे 'इंडिपेंडंट सेफ्टी ऑडिट' (Independent Safety Audit) करण्याची मागणी आता जोर धरत आहे. समृद्धी महामार्ग वेगाचे प्रतीक असावा, भीतीचा नाही; त्यामुळे प्रशासनाने तातडीने कठोर सुरक्षा उपाययोजना लागू करण्याची गरज आहे.

ही बातमी वाचा:

Samruddhi Mahamarg Accident: दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?