Sandeep Deshpande on Nileshchandra Muni: मुंबईतील कबूतरखान्यांचा (Pigeon Feeding Centers) वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील बंद करण्यात आलेले सर्व कबूतरखाने पूर्ववत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी जैन मुनी निलेशचंद्र (Nileshchandra Muni) यांनी केली आहे. जर हे कबूतरखाने पुन्हा सुरू केले गेले नाहीत, तर पायधुनी येथील पार्श्वनाथ जैन मंदिरासमोर पुन्हा एकदा आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुनींच्या या इशाऱ्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली असून "हे राज्य कायद्याने चालते, परेस-दिनेस कोणी चालवत नाही," अशा शब्दांत त्यांना फटकारले आहे.

Nileshchandra Muni: विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर वादाची ठिणगी

ऑगस्ट 2025 मध्ये दादर कबूतरखान्यावरून (Dadar Kabutarkhana) मोठा वाद निर्माण झाला होता. कबूतरखाने सुरू राहावेत यासाठी जैन मुनी आणि जैन समाजाकडून मोठा विरोध व आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याला उत्तर म्हणून मराठी एकीकरण समितीने कबूतरखाने बंदच राहावेत यासाठी प्रतिआंदोलन केले होते.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानावर जैन समाजाच्या आंदोलनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कबूतरखान्यांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. काल जैन मुनी निलेशचंद्र यांनी थेट विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. "आठ महिने उलटूनही मुंबईतील सर्व कबूतरखाने बंदच आहेत," असा आरोप निलेशचंद्र मुनी यांनी या भेटीदरम्यान केला आणि लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला.

Mumbai Kabutarkhana: न्यायालयाचे निर्देश अन् महापालिकेचे नियमावली

मागील वर्षी हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले होते, तेव्हा न्यायालयाने 13 सदस्यांची समिती नेमली होती. मुंबई महापालिकेने (BMC) संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून केवळ मानवी वस्तीपासून 500 मीटर दूर अशा चार ठिकाणीच 'नियंत्रित खाद्य वितरण' करण्यास परवानगी दिली होती.

Mumbai Kabutarkhana: महापालिकेने निश्चित केलेली 4 ठिकाणे

1. वरळी जलाशय

2. अंधेरीतील खारफुटी परिसर, लोखंडवाला बँक मार्गाजवळील वर्सोवा प्रकल्प

3. मुलुंड पूर्वेकडील खाडी परिसर, जुना ऐरोली-मुलुंड जकात नाका

4. बोरिवलीतील गोराई मैदान

या चार ठिकाणी स्वयंसेवी संस्थांमार्फत ठरवून दिलेल्या नियमांनुसारच कबुटरांना खाद्य टाकण्यास परवानगी आहे. मात्र, पूर्ववत सुरू असलेले दादर कबूतरखान्यासह मुंबईतील सर्वच्या सर्व कबूतरखाने पुन्हा मोकळे करावेत, या मागणीवर जैन मुनी ठाम आहेत.

Sandeep Deshpande on Nileshchandra Muni: संदीप देशपांडेंना फटकारलं

जैन मुनी निलेशचंद्र यांच्या या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, "हे जे राज्य आहे ते कायद्याने चालते, परेस दिनेस कोणी चालवत नाही. कायदा सांगतो एखाद्या गोष्टीमुळे लोकांना त्रास होत असेल तर ती बंद व्हायला पाहिजे. त्यांचा प्रश्न आहे आणि विधानसभा अध्यक्ष यांचा प्रश्न आहे, कायद्यापुढे कोणी नाही. आमचीच मागणी हीच की, कायद्याचं पालन व्हायला पाहिजे. यावर सरकारने कारवाई करायला हवी. 2 तास 1 तास नाही, लोकांनी सांगितलंय त्यांना त्रास होतो, त्यामुळे ही गोष्ट बंद व्हायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. आता संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रियेवर निलेशचंद्र मुनी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Mangalprabhat Lodha and Nilesh Chandra Muni: मंगलप्रभात लोढांनी जैन समाजाचा आवाज दाबलाय, मुंबईतील सर्व कबुतरखाने सुरु केले नाही तर...; मुनी निलेशचंद्र महाराजांचा निर्वाणीचा इशारा