हॉटेल व्यावसायिकांना परवाना निलंबित करण्याच्या धमक्या देऊन FDA चे अधिकारी मोठ्या प्रमाणात वसुली करीत आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय... तुकाराम मुंढेंनी FDA आयुक्ताचा कारभार हाती घेतल्यानंतर भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.. पण यात धाड मुंढेंची आणि कमाई अधिकाऱ्यांची? असा प्रश्न उपस्थित करत, संजय राऊतांची तुकाराम मुंढेंना एक पत्र लिहलं आहे.. या पत्रात काय? जाणून घेऊया..

'मुंडे साहेब, तुमच्या धडाडीच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालीये आणि याच दहशतीचा गैरफायदा तुमचेच अधिकारी घेत आहेत!, असं पत्र संजय राऊत यांनी लिहलं आहे..

या पत्रात संजय राऊत यांनी अन्न व सुरक्षा भेसळ याबाबतच्या कारवाईबाबत अभिनंदन करत FDA अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीबाबत तात्काळ कारवाईच्या मागणी केलीये. तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्त झाल्यानंतर ज्या कारवाया केल्या त्याचं संजय राऊत यांनी अभिनंदन करत काही गोष्टी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

FDA चे अधिकारी उघडपणे हॉटेल, रेस्टॉरंट, क्विक कॉमर्स व्यवसायांना परवाना निलंबनाच्या धमक्या देऊन मोठ्या प्रमाणात वसुली करीत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना धमक्या, ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा जास्त जोमाने सुरू झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी पत्रात करत तुकाराम मुंडेंना याबाबत तक्रार केली आहे.

एफडीएचे वांद्रेतील मुख्यालय, ठाणे कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लुटीचा मुख्य अड्डा आहे. तेथे अधिकारी खुलेआम पैसे मागतात. नागपूर, पुणे, सोलापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर येथील लुटीच्या 'कथा' घेऊन अनेक सामान्य व्यावसायिक मला भेटले, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.

राऊत यांच्या पत्रातील सर्वात धक्कादायक दावा म्हणजे, 'मुंडे एफडीए कमिशनर होण्यापूर्वी हॉटेल किंवा व्यवसाय बंद करण्याची नोटीस (Closing Notice) न देण्यासाठी १० ते १२ हजार रुपयांची लाच घेतली जायची. पण मुंढेंच्या नावाची दहशत दाखवून अधिकाऱ्यांनी हाच दर आता ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत वाढवला आहे!

एफडीएचा कायदा काय सांगतो? तपासणी करा, १५ दिवसांची मुदत द्या, सुधारणा नोटीस द्या आणि मग सुनावणी घेऊन कारवाई करा. पण अधिकारी या कोणत्याही प्रक्रियेचं पालन न करता, थेट परवाना निलंबनाची धमकी देऊन वसुली करत आहेत.

राऊतांनी पत्रात काही गंभीर उदाहरणे दिली आहेत:

-ठाण्यातील प्रकरण: ठाण्यातील एका अधिकारी जोडीने 'क्विक कॉमर्स' कंपनीचा निलंबित परवाना पुन्हा सुरु करण्यासाठी तब्बल १७ ते १८ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

-सोशल मीडियावरील पोस्ट: एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष उंदीर सापडला नाही, पण सोशल मीडियावरील एका पोस्टच्या आधारे त्या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला!

-बनावट तक्रारी: ग्राहकांच्या खोट्या तक्रारींची कोणतीही शहानिशा न करता थेट छापे मारले जात आहेत."

या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत

बांद्रा, ठाणे आणि इतर विभागांतील 'क्लोजिंग नोटीस रेट कार्ड'ची तातडीने स्वतंत्र चौकशी करा.

ग्राहकांच्या तक्रारींवरून मारल्या जाणाऱ्या धाडींची आधी पडताळणी अनिवार्य करा.

कायदेशीर प्रक्रिया बायपास करून थेट वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा.

ठाण्यातील १७-१८ लाखांच्या वसुली प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा.

परवाना निलंबन आणि तो पुन्हा देण्याच्या सर्व कारणांची आणि सुनावणीची माहिती सार्वजनिक (Public) करा."

एकीकडे तुकाराम मुंढे हे आपल्या शिस्तबद्ध आणि कडक प्रशासनासाठी ओळखले जातात, तर दुसरीकडे त्यांच्याच नावाचा धाक दाखवून अधिकारी वसुली करत असल्याचा आरोप थेट राऊतांनी केलाय. आता या गंभीर आरोपानंतर तुकाराम मुंढे स्वतःच्याच विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल