अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेवा, समर्पण आणि ग्रामविकासाचा विचार तळागाळातील जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने आयोजित 'सेवा संकल्प यात्रे'चे शनिवारी अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पवित्र अशा गुरुकुंज मोझरी येथे उत्साहात आगमन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या पावन पुण्यभूमीत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे आणि गादीचे मनोभावे दर्शन घेतले.

वृक्षारोपण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि साहित्य वाटप

गुरुकुंज आश्रमात या यात्रेनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आणि विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर समाजसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सेवा, समाजहित आणि ग्रामविकासाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला.

'राष्ट्रसंतांचा ग्रामोन्नतीचा विचार मोदीजी पुढे नेतात'

उपस्थितांना संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या प्रभावी लेखनातून आणि कार्यातून जनसहभागातून 'ग्रामोन्नती'चा विचार समाजासमोर मांडला. हाच ग्रामविकासाचा विचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे घेऊन जात आहेत."

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्परतेने कार्यरत राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्याला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार प्रताप अडसड, आमदार राजेश वानखडे, आमदार चंदू यावलकर, अमरावती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, डॉ. नितीन धांडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे यांच्यासह नितीन गुढदे, आरती वानखडे, जयंत डेहनकर, किरण पातुरकर, बादल कुलकर्णी, चेतन गावंडे, डॉ. संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.