Shardiya Navratri 2026 : सध्या देशभरात शारदीय नवरात्रौत्सावाचा जागर सुरूय. आणि नवरात्र म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो देवीचा जागर, उपवास, गरबा आणि दांडियाचा उत्साह. मात्र, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या पांडे गावात नवरात्र साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. येथे नऊ दिवस आणि नऊ रात्री उभे राहून उपवास करण्याची प्रथा जपली जाते. ‘उभ्याची नवरात्र’ म्हणून ओळखली जाणारी ही परंपरा श्रद्धा, संयम आणि अढळ भक्तीचे प्रतीक मानली जाते.

नऊ दिवस, नऊ रात्री उभे राहून उपवास! (Shardiya Navratri 2026)

पांडे गावात तब्बल साडेतीनशे वर्षांपासून ‘उभ्या नवरात्र’ची परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते. या परंपरेनुसार, गावातील प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती नवरात्रीचा उपवास करते. मात्र, हा उपवास इतर उपवासांपेक्षा वेगळा आहे. उपवास करणाऱ्या व्यक्तीला नऊ दिवस जमिनीवर बसणे किंवा झोपणे टाळावे लागते. संपूर्ण कालावधीत उभे राहून देवीची आराधना आणि उपवासाचे नियम पाळले जातात.

काठीचा आधार, विश्रांतीसाठीही अनोखी पद्धत! (Satara Maharashtra News)

मिळालेल्या माहितीनुसार, या उपवासादरम्यान चालण्यासाठी काठीचा आधार घेतला जातो. विश्रांतीची गरज भासल्यास मंदिरात तयार केलेल्या झोपाळ्यावर एका पायाचा आधार खाली ठेवून आडवे राहण्याची पद्धत असल्याचे सांगितले जाते. या कठोर नियमांचे पालन करत भाविक नऊ दिवस देवीची सेवा आणि उपासना करतात. त्यामुळे या परंपरेत केवळ उपवासच नव्हे, तर शारीरिक संयमाचीही कसोटी लागते.

अनवाणी गावाला दोन वेळा प्रदक्षिणा

‘उभ्या नवरात्र’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपवास करणाऱ्या भाविकांचा पोशाख आणि दैनंदिन धार्मिक विधी. उपवासकर्ते पांढरा पोशाख परिधान करतात. तसेच नऊ दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी अनवाणी म्हणजेच पायात काहीही न घालता गावाला प्रदक्षिणा घालतात. देवीवरील श्रद्धा आणि परंपरेप्रती असलेली निष्ठा व्यक्त करण्यासाठी हा विधी केला जातो.

साडेतीनशे वर्षांची परंपरा आजही कायम

बदलत्या काळात अनेक पारंपरिक प्रथा मागे पडत असताना पांडे गावातील ‘उभ्या नवरात्र’ची परंपरा आजही जपली जात असल्याचे सांगितले जाते. गावकऱ्यांसाठी हा केवळ धार्मिक विधी नसून श्रद्धा, सामूहिक सहभाग आणि पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरेचा वारसा आहे. नवरात्रीत देशभर देवीची उपासना वेगवेगळ्या पद्धतींनी केली जाते. मात्र, वाई तालुक्यातील पांडे गावातील ही अनोखी परंपरा विशेष लक्ष वेधून घेते. कठोर नियमांचे पालन करत देवीची आराधना करणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेतून या गावातील धार्मिक परंपरेचे वेगळेपण अधोरेखित होते. श्रद्धा, संयम आणि भक्तीचा संगम असलेली पांडे गावातील ‘उभ्या नवरात्र’ची परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक-सांस्कृतिक वारशातील एक आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरते.

हेही वाचा :

Shardiya Navratri 2026: कन्यापूजन कोणत्या वयोगटातील मुलींचे योग्य मानतात? वयानुसार देवीची कोणते स्वरूप? अष्टमी की नवमीला पूजन? शास्त्र, धार्मिक मान्यता...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा कवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)