Sugarcane : खासगी वजन काट्यावरील ऊस नाकारता येणार नाही; साखर आयुक्तालयाचा निर्वाळा

1 week ago 2
ARTICLE AD

पुणे - वैधमापन शास्त्र विभागाने प्रमाणित केलेल्या कोणत्याही खासगी वजन काट्यावरील शेतकऱ्याचा ऊस नाकारता येणार नाही. तसेच, खासगी व साखर कारखान्याकडील वजन काट्यावरील वजनात तफावत आढळल्यास शेतकऱ्याला तक्रार दाखल करता येईल. या तक्रारीची सुनावणी घेतली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

वजन काट्यांबाबत साखर आयुक्तालयाने यापूर्वीही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत साखर कारखान्यांना वजनाची कार्यपद्धती कळवली होती. परंतु, कारखान्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे काटामारीबाबत शेतकऱ्यांकडून पुन्हा तक्रारी येऊ लागल्या. यामुळे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी पुन्हा काटामारी रोखण्यासाठी नव्याने आदेश जारी केला आहे.

‘‘खासगी वजन काट्यावर वजन केले म्हणून शेतकरी, वाहनचालक किंवा मुकादमाविरोधात साखर कारखान्याला कारवाई करता येणार नाही. तसेच, खासगी काट्यावर वजन केले म्हणून शेतकऱ्यांच्या उसाच्या गाड्यांचा क्रम जाणीवपूर्वक डावलता येणार नाही. तसेच खासगी काट्यावर वजन केले म्हणून पुढील वर्षीची उसाची नोंदणी रद्द करण्याचा प्रकारदेखील बेकायदेशीर असेल,’’ असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

खासगी वजन काट्यावर वजन करीत ऊस आणला म्हणून अशा शेतकऱ्याचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रकार अवैध असेल. तसेच खासगी व कारखान्याच्या वजन काट्यावरीवर उसाच्या वजनात तफावत आढळल्यास चौकशी केली जाईल. काटामारीविरोधात साखर कारखान्यांना दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्यास अनुचित प्रथांच्या विरोधात शेतकऱ्याला प्रादेशिक साखर सहसंचालकाकडे तसेच वैधमापन शास्त्र विभागाच्या जिल्हा उपनियंत्रकांकडे तक्रार दाखल करता येईल, असे आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

‘‘काटामारी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मात्र तरीही काटामारी चालत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनाची नोंद तत्काळ न मिळणे, वजनात पारदर्शकता नसणे, अशाही तक्रारी विविध शेतकरी संघटनांकडून आलेल्या आहेत.

खासगी वजन काट्यावर केलेले वजन पुढे साखर कारखान्यांच्या काट्यावर कमी भरते व या काटामारीला संरक्षण देण्यासाठी कारखान्यांकडून खासगी काट्यांचे वजन ग्राह्य धरले जात नाही, असा मुद्दा ऊस उत्पादकांचा आहे. साखर आयुक्तालयाने हा मुद्दा राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाकडे पाठवला होता. त्यावर या विभागाने, ‘वैधमापन शास्त्र (सर्वसाधारण) नियम २०११’ नुसार कोणत्याही वजन काट्याची पडताळणी आणि मुद्रांकन एकसमान असते. त्यामुळे कोणत्याही अधिकृत खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस संबंधित साखर कारखान्याने नाकारल्यास अनुचित प्रथा ठरेल,’’ असा स्पष्ट अभिप्राय दिला. त्यामुळे आता खासगी वजन काट्यांचा वापर अमान्य करणाऱ्या साखर कारखान्यांची कोंडी झाली आहे.

राज्यातील साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत आक्षेप येत होते. त्यामुळे उसाच्या वजनाबाबत सुधारित मार्गदर्शक बाबींची आवश्यकता होती. साखर आयुक्तालयाने मार्गदर्शक कार्यपद्धती जारी केली आहे. साखर कारखान्यांनी या कार्यपद्धतीमधील सूचनांची अंमलबजावणी केल्यास वजन काट्यांबाबत आक्षेप येणार नाहीत.
- डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त

Read Entire Article