कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांनी आज ऑडिओ क्लिपचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली. या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. 500 कोटींच्या आरोपांपासून ते राज्यातील वातावरण दुषित करण्यापर्यंतच्या षडयंत्रांचा खुलासा या क्लिपमध्ये (Uday Samant On Jarange Audio Clip) झाला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. शिंदे गटाच्या नेत्यांनी आता याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर याबाबत आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले, ऑडीओ क्लिपमध्ये भाजपाच्या म्हणजे आमच्या मित्र पक्षाच्या संबंधित लोकांची नाव देखील आहेत आणि म्हणून या पत्रकार परिषदेतून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे शिवसेनेच्या वतीने मागणी करतोय की, या पूर्ण ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे. (Uday Samant On Jarange Audio Clip)

या ऑडिओ क्लिपमध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये जे काही उल्लेख आहेत, ते कोणी केलेत, कशासाठी केलेत, याची देखील सविस्तर चर्चा झाली पाहिजे, त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. जे आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी हाताळलेलं होतं. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली होती. त्यांच्याबद्दलचंच बदनामीकारक वक्तव्य या पूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ऑडिओ क्लिपमधून झालेला आहे, तर ती ऑडिओ क्लिप कशासाठी व्हायरल केली गेली, कुणी रेकॉर्ड केली, त्याच्यामध्ये मराठा आंदोलनाच्या संदर्भातला नक्की काय करण्याचा प्रयत्न होता, ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होता का, याची देखील चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी उदय सामंतांनी केली आहे.. (Uday Samant On Jarange Audio Clip)

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की, अशा पद्धतीची ही जर ऑडिओ क्लिप खरी असेल, तर हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्याच्यातली चर्चा ही फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेंशी मर्यादित नाही, तर अनेक गोष्टींवर त्याचा उहापोह केलाय. काहीही संबंध नसताना डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा उल्लेख केल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब बदनाम होतील, शिवसेना बदनाम होईल, अशा पद्धतीचं षडयंत्र देखील त्या क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय आणि फारच दुर्दैवाची बाब आहे. त्याच्यामुळे ही ऑडिओ क्लिप, त्याची फॉरेन्सिक चौकशी झाली पाहिजे, त्याची सायबर चौकशी झाली पाहिजे, त्याची एसआयटी सारख्या मोठ्या यंत्रणेकडनं चौकशी झाली पाहिजे, आणि ही चौकशी झाल्यानंतर याच्यामध्ये जे कोण बोललेत, हा त्यांचा आवाज खरा आहे की खोटा आहे, हे देखील जनतेसमोर आला पाहिजे, असंही उदय सामंत यांनी म्हटलंय.

तर तो ऑडीओ क्लिप जर खरा असेल, तर त्याच्यावर काय कारवाई होणार आहे, हे देखील भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, हे मराठा समाजासाठी इतकं चांगलं काम करत असताना, अशा पद्धतीनं षडयंत्र तयार करणं, जर हे खरं असेल तर, तर हे योग्य आहे का? याचा देखील खुलासा संबंधित यंत्रणेकडनं होणं गरजेचं आहे. आणि जर आपण याच्यामध्ये काही उल्लेख बघितले, तर यातला एकच उल्लेख मी आपल्याला वाचून दाखवतो मुद्दाम, जे मनोज जरांगे पाटलांनी काल, काल आणि आज सकाळी देखील त्या क्लिपच्या पद्धतीनं आणि जी क्लिप आहे, त्याच्यातला उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत, की श्रीकांत शिंदेंनी मला ५०० कोटी रुपये दिल्याचे त्या क्लिपमध्ये सांगत आहेत आणि हे कोण सांगत आहे? तर एक महिला या क्लिपमध्ये असं सांगतेय की, माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ५०० कोटी रुपये यांना दिले. त्याच्यापुढे ते असं म्हणतात, की याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि आमची देखील हीच मागणी आहे, की जी व्यक्ती भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे, त्या व्यक्तीनं असं वक्तव्य जे केलेलं आहे, तर त्यांची पहिली चौकशी झाली पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे.

एक याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की, काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःवून याची भूमिका स्पष्ट केलेली की, असा प्रश्नच येत नाही. आणि जरांगे पाटलांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे की, त्यांना मिळालेले पण नाहीत. त्याच्यामुळं पैसे देणं आणि घेणं हा विषय कालच संपलेला आहे. पण अशा पद्धतीचं अशा क्लिपमधनं एक षडयंत्र तयार करणं आणि समाजाच्या आंदोलनामध्ये तेढ निर्माण करणं, महाराष्ट्राच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणं, आपल्याच मित्र पक्षाच्या नेत्यांबद्दल गैरसमज निर्माण करणं, या बाबतीमध्ये आमची प्रामुख्याने मुख्यमंत्री यांना मागणी आहे की, हे जे काही घडलेलं आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सखोल चौकशी नुसती करून उपयोगाची नाही, तर याच्यामध्ये जे आवाज आहेत, ते देखील फॉरेन्सिक लॅब (Lab)कडे पाठवले पाहिजेत आणि या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी झालं पाहिजे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे.

भले आमच्या आणि मनोज जरांगे पाटलांच्यात आता मतभेद झाले असतील, ते शिंदे साहेबांबद्दल बोलत असतील, बदनामी कारक बोलत असतील, परंतु मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं हे कोणी नाकारता येणार नाही. आणि मराठा समाजासाठी आंदोलन करत असताना, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना, ओबीसीला धक्का न लावता, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. हे देखील मनोज जरांगे पाटलांना माहिती आहे. परंतु अशा सगळ्या क्लिपमधनं आणि अशा सगळ्या ब्रीफिंगमधनं एकनाथ शिंदे साहेबांबद्दल गैरसमज पसरवण्याचा कुटिल डाव जर कोण आखत असेल, तर त्याची 100% चौकशी झाली पाहिजे, ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी मला सांगायची आहे, ती खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा याच्याशी काहीच संबंध नाही. म्हणजे त्यांचं नाव याच्यामध्ये घेतलं, की शिवसेना आली, त्यांचं नाव याच्यामध्ये घेतलं, की एकनाथ शिंदे आले आणि हे दोघं याच्यामध्ये आले, की शिवसेना आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. हे कोणालातरी करायचं होतं, म्हणूनच दोन-अडीच वर्षांपूर्वी कदाचित ही क्लिप जी आता हातामध्ये आली, त्याच्यामध्ये हे सगळं संभाषण आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी काय सांगितलं, की क्लिपमधनं हे खरं असेल, तरीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे आणि या संदर्भात जी क्लिप आज संपूर्ण मीडियाकडे गेली, महाराष्ट्रातल्या जनतेकडे गेली, विशेषतः मराठा समाजाकडे गेलेली आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही आमची 100% मागणी आहे.

त्याच्यामध्ये अजून दोन-तीन तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील, की याच बरोबर त्या संपूर्ण क्लिपमध्ये अनेक काही संभाषण आहेत. त्याच्यामध्ये आंदोलन कशा पद्धतीने थांबवायचं, आंदोलन थांबवत असताना गाड्या जे देत आहेत, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा, तो बंदोबस्त झाला नाही तर संबंधित यंत्रणेला बोलून त्याच्यासाठी काय करायचं, हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि हे सगळं बोलत असताना ५०० कोटी रुपयांचा उल्लेख झालाय.परंतु हे सगळं करत असताना ५०० कोटी रुपयांचा उल्लेख झालाय, डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा, हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आमची मागणी आहे, की ज्या आंदोलनाशी समर्थन करण्यापलीकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काही केलेलं नव्हतं. ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या सगळ्या बाजू तशाच ठेवून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील अग्रेसर होते. त्यांच्या नावाची बदनामी झाली, म्हणजे आपोआप एकनाथ शिंदेंच्या नावाची बदनामी होते आणि शिवसेनेची बदनामी होते, हे डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी केलेल्या तुम्हाला-आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालेल्या आहेत, असंही उदय सामंतांनी म्हटलं आहे.

मी स्वतः मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय देखील वेळ देणार आहेत. मागणी जी मी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे, तीच मागणी आहे. की या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि नुसती चौकशी नाही, फॉरेन्सिक चौकशी देखील झाली पाहिजे. हे नक्की आवाज कोणाचे आहेत, ते जनतेसमोर आले पाहिजेत. हे कोण बोलले आहेत, ते देखील जनतेसमोर आले पाहिजेत. याच्यामध्ये विविध लोकांची नाव आहेत, ती देखील जनतेसमोर आली पाहिजेत. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न कोण करतंय का? की जे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहिती नाही आहे? मुख्यमंत्री महोदयांच्या अपरोक्ष या सगळ्या गोष्टी होत आहेत का? बावनकुळे यांच्या अपरोक्ष या गोष्टी होत आहेत का? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अपरोक्ष या गोष्टी होत आहेत का? याची देखील भारतीय जनता पार्टीने चौकशी केली पाहिजे आणि शेवटी अलायन्स मधलं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे अतिशय सक्षमपणानं सरकार चालवत असताना, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला माहिती नसताना अशा काही गोष्टी होत आहेत का? याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि ही जी क्लिप आहे, ही कशासाठी व्हायरल झाली? कुणी व्हायरल केली? आजच या चार दिवसांमध्ये व्हायरल होण्याचं कारण काय? ही जरांगे पाटलांच्या हातामध्ये कशी गेली? याची देखील सविस्तर चौकशी व्हावी. हीच आमची, हीच आमची मागणी आहे, असंही उदय सामंत म्हणालेत.

मी पहिलं काय सांगितलं की, भारतीय जनता पार्टीच्या संबंधित असलेली लोकं ही या क्लिपमध्ये आपल्याला आढळतायत. त्याच्यामुळे ही क्लिप खरी आहे की खोटी आहे, याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जर खरी असेल, तर त्यांनी हे कृत्य का केलं? याचा खुलासा झाला पाहिजे. त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की भारतीय जनता पार्टी असेल की शिवसेना असेल, आमच्या दोघांनी दोन्ही पक्षाचा आणि एनएसीपीचं अलायन्सचं सरकार आहे. नेत्यांच्या अपरोक्ष, किंवा नेत्यांना गाफील ठेवून, किंवा नेत्यांच्या नजरेआड, असं जर कोण करत असेल, तर त्याला देखील बंधन असलं पाहिजे. त्यांना देखील काहीतरी लिमिट असलं पाहिजे. आणि म्हणून दोन्ही स्तरावर चौकशी झाली पाहिजे. एक पोलिसांच्या स्तरावर झाली पाहिजे. एक सायबरच्या स्तरावर झाली पाहिजे. एक फॉरेन्सिकच्या स्तरावर झाली पाहिजे आणि एक पक्षाच्या स्तरावर देखील झालं पाहिजे, की नेत्यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करत असेल, तर ते योग्य आहे का? हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे, असंही सामंत म्हणालेत.

आमची प्रामाणिकपणाची, शिंदे साहेबांची देखील इच्छा आहे. आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे, की अलायन्समध्ये अशा गोष्टी होणं योग्य नाही. जर होत असतील तर. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं ना, की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जे विचारलं, की शिष्टमंडळ भेटणार आहे का? तर त्या शिष्टमंडळासाठी भेट मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची मागितलेली आहे. आमचे मुंबईचे खासदार, आमदार हे संध्याकाळी त्यांना जाऊन भेटणार आहेत. आणि आमच्या विविध शिवसेनेच्या नेत्यांनी देखील हीच मागणी केलेली आहे. आम्ही काय असं कोणावर संशय ठेवून मागणी करत नाही आहोत. आम्ही शिवसेना म्हणून मागणी करतोय. त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा उल्लेख झालाय की नाही? मग आमची भूमिका स्पष्ट आहे की, याची चौकशी झाली पाहिजे आणि असं का घडतंय, हे जनतेसमोर आलं पाहिजे, असंही सामंतांनी म्हटलं आहे.