Urban Naxalism News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक मोठ्या शहरात राहून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आणि विद्यार्थी दशेत सोबतच्या विद्यार्थ्यांना, तरुणांना हेरून, त्यापैकी अनेकाना सशस्त्र नक्षल चळवळीकडे ढकलणाऱ्या विकास रामास्वामी मेकलाची (Vikas aka Anil Ramaswamy Mekala) धक्कादायक कबुली 'एबीपी माझा'ने महाराष्ट्रासमोर आणली. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबईत असताना विकासने काय काय केलं? याची स्पष्ट कबुलीच त्याने स्वतः एबीपी माझाच्या कॅमेरासमोर दिली. आई-वडिलांच्या आत्मसर्पणानंतर अचानक मुंबई सोडावी लागल्यानंतर आधी चंद्रपूर आणि नंतर नागपुरात (Nagpur) आलेल्या विकासने नागपुरात काय केलं याचाही एक्सक्लुझिव्ह मात्र अत्यंत धक्कादायक वास्तव एबीपी माझाने मांडलं आहे. नागपुरात आल्यानंतर विकास रामास्वामी मेकलाचा अनिल नागपुरे कसा झाला? विकास रामास्वामीचे अनिल नागपुरे मध्ये रूपांतरण करताना नक्षलवाद्यांनी एका निर्दोष विद्यार्थ्यावर कसा अन्याय केला? त्या निर्दोष विद्यार्थ्याला कसे पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले आणि अटक ही व्हावे लागले? याची धक्कादायक कबुली विकास म्हणजेच नकली अनिल नागपुरेच्या तोंडून पुन्हा एकदा समोर आली आहे.(Urban Naxalism News)

Urban Naxal: मुंबई सोडल्यानंतर नागपुरातील कारनाम्याबद्दल विकास रामास्वामीने एबीपी माझाला काय सांगितले?

मुंबईत असताना माझे नाव कधी विकास, तर कधी नवज्योत होते. मात्र मुंबई अचानक सोडावी लागल्यामुळे ते नाव आणि सर्व डॉक्युमेंट्सही मला मुंबईत सोडावे लागले. नागपुरात मी अनिल नागपुरे हे नवे नाव धारण केले. त्यासाठी माझा मार्गदर्शक मिलिंद तेलतुंबडे (महाराष्ट्रातील आजवरचा सर्वात मोठा नक्षली कमांडर) याने अनिल नागपुरे नावाच्या एका विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स मला आणून दिले. त्यामध्ये अनिल नागपुरे या विद्यार्थ्यांची दहावी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला होता. अनिल नागपूरचे हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट मला मिळाल्यानंतर काही खोटे डॉक्युमेंट मी नागपुरात तयार केले आणि त्या आधारावर नागपूरच्या धनवटे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

Urban Naxalism News : चंद्रपुरात आमचे 19 नक्षली सहकारी पकडले गेले अन्...

दरम्यान, अनिल अभ्यासात हुशार नव्हता, त्याला पुढे शिकायचे नव्हते, त्यामुळे त्याने स्वतःहून मिलिंद तेलतुंबडेकडे ते डॉक्युमेंट दिले. असा दावाही यावेळी विकास रामास्वामीने केला. तर नागपूरात शिक्षण घेताना चंदन नगर, मेडिकल चौक परिसर, पाचपावली, जरीपटका अशा विविध भागात काही काही महिन्यांनी घर बदलून राहिलो. नागपुरात अकरावीपासून बीए सेकंड ईयरपर्यंत विनाअडचण शिक्षण घेतले. मुंबईतही बीए सेकंड ईयरपर्यंत शिक्षण घेतले होते. मात्र अचानक मुंबई सोडताना सर्व शैक्षणिक डॉक्युमेंटही तिथे सोडावे लागले. त्यामुळे नागपुरात नव्या नावाने पुन्हा अकरावीपासून अभ्यास केला. मात्र तेव्हाच चंद्रपुरात आमचे 19 नक्षली सहकारी पकडले गेले आणि त्या तपासाची पुढची लिंक शोधत पोलिसांनी नागपुरात ही शोध मोहीम सुरू केली. मी शिकत असलेल्या कॉलेजपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांना अनिल नागपुरे हे नाव कळल्यावर त्यांनी माझा शोध सुरू केला.

Urban Naxalism News : नागपुरात पुन्हा नव्या नावाने शिक्षण, बारावीत 75 टक्के गुण

मात्र, मी त्यांना सापडलो नाही, म्हणून खऱ्या अनिल नागपुरेला (ज्याचे डॉक्युमेंट वापरून मी खोट्या नावाने शिक्षण घेत होतो) पोलिसांनी अटक केली. अनेक दिवस त्याची चौकशी केली. जेव्हा तो खरा अनिल नागपुरे असून त्याचे डॉक्युमेंट माझ्यासारख्या नक्षलवाद्याने वापरल्याचे पोलिसांना माहीत झाले, तेव्हा खऱ्या अनिल नागपुरेची पोलिसांनी सुटका केली. मात्र तोवर मी नागपूर सोडून गडचिरोलीच्या जंगलात सुरक्षित पोहोचलो होतो. आम्ही फक्त अनिल नागपुरेचे डॉक्युमेंट्स वापरले, त्याला शिक्षणात रस नव्हता, त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान आम्ही केलेलं नाही, असा दावाही विकास रामास्वामीने केला आहे. उलट त्याच्या नावावर मी घेतलेल्या शिक्षणातून बारावीत 75 टक्के गुण घेतले तो कधीच एवढे गुण घेऊ शकत नव्हता. असेही विकास रामास्वामी म्हणाला.

Urban Naxalism : अनेक शहरांमध्ये नक्षली शिक्षणाआड अजूनही कार्यरत?

महाराष्ट्राच्या शहरी भागात नक्षलवादाचे जाळे कसे पसरले आहे, याचा धक्कादायक आणि स्फोटक खुलासा एबीपी माझाच्या 'सुपर एक्सक्लुसिव्ह' मुलाखतीतून समोर आला आहे. आत्मसमर्पित नक्षली कमांडर विकास उर्फ अनिल रामास्वामी मेकला याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबईतील नामांकित रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेजमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना माओवादी विचारसरणीकडे कसे आकृष्ट केले, याचे खळबळजनक वास्तव मांडले आहे. या मुलाखतीवर नक्षलविरोधी मोहिमेचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया देत, शहरी नक्षलवाद हे देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेपुढील मोठे आव्हान असल्याचे मान्य केले आहे.