Yasmin Shaikh Passes Away: व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं आज (24 ऑगस्ट) निधन (Yasmin Shaikh Passes Away) झालं. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वृद्धाश्रमात यास्मिन शेख यांचं निधन झालं. यास्मिन शेख यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा.रुकसाना अशा दोन मुली आहेत. जेरुषा रुबेन असं यास्मिन शेख यांचं मूळ नाव, जन्माने ज्यू होत्या.अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाला होता. अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह केल्यानंतरही यास्मिन यांनी धर्म बदलला नाही.

प्रा. यास्मिन शेख यांची ओळख- (Yasmin Shaikh Passes Away)

प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव जेरुशा रुबेन होते. त्यांच्या वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणापासूनच त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली आणि शिक्षणाची गोडी निर्माण झाली. त्यांनी पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून बी.ए. केले. मराठी विषयात त्यांची विशेष गुणवत्ता होती. प्रा. एस. एम. माटे आणि प्रा. के. एन. वातवे यांसारख्या शिक्षकांचा त्यांच्या भाषाविषयक जडणघडणीवर प्रभाव पडला. पुढे त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.

अध्यापनाची प्रदीर्घ कारकीर्द- (Yasmin Shaikh Passes Away)

1949 मध्ये त्यांनी अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. विवाहानंतर त्यांचे नाव यास्मिन शेख झाले. उपलब्ध चरित्रात्मक लेखांनुसार, त्यांचा जन्म ज्यू कुटुंबात झाला होता; मात्र पुढे त्यांचे आयुष्य मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाशी पूर्णपणे जोडले गेले. यास्मिन शेख यांनी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केले. त्यानंतर मुंबईतील एसआयईएस कॉलेज, शीव येथे मराठीच्या प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केले. तेथे श्री. पु. भागवत आणि विंदा करंदीकर यांसारख्या साहित्यिकांबरोबर त्यांनी काम केले. त्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुखही राहिल्या. निवृत्तीनंतरही त्यांचे भाषेवरील काम थांबले नाही. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना आणि IAS/UPSC परीक्षार्थींना मराठी व्याकरण व भाषाशास्त्र शिकवले.

‘व्याकरण सल्लागार’ म्हणूनही यास्मिन शेख यांची ओळख- (Yasmin Shaikh Passes Away Marathi News)

‘अंतर्नाद’ मासिकाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता आणि यास्मिन शेख ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून मानाचे स्थान मिळाले. मराठी लेखनातील चुका, व्याकरण आणि शब्दप्रयोग याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक जण संपर्क साधत असत. यास्मिन शेख यांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेवर निस्सीम प्रेम, पण भाषेकडे संकुचित दृष्टिकोनातून न पाहण्याची भूमिका. त्या बोलीभाषांना विरोध करत नसत; उलट प्रमाणभाषा, बोलीभाषा आणि भाषेतील विविधता यांचा अभ्यासपूर्ण विचार करत. त्यांच्या शंभराव्या वर्षातील भाषणातही त्यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला.

यास्मिन शेख यांच्या लेखनातील महत्त्वाची पुस्तके- (Yasmin Shaikh Passes Away)

मराठी लेखन मार्गदर्शिका

मराठी शब्दलेखन कोश

सुगम मराठी व्याकरण कोश

यास्मिन शेख यांचा संग्रहित माझा कट्टा, VIDEO: