अग्रिम मदतीमधून कर्जवसूूलीस मनाई

2 days ago 3
ARTICLE AD
पान-३ टॉपला -------- अग्रिम मदतीमधून कर्जवसुलीस मनाई जिल्हा प्रशासनाचे आदेश : अन्यथा बँकावर कारवाई करणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२८ ः दुष्काळ बाधित शेतकऱ्यांना सरकारने ५ हजार रुपयांची अग्रिम मदत मंजूर केली आहे. या अनुदानातून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बँकावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारादेखील प्रशासनाने दिला आहे. पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने यंदा खरीप हंगाम हातचा गेला असून शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. सरकारने जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ घोषित करून विविध १२ प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. संबंधित तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीची मदत म्हणून ५ हजार अग्रिम मदत देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने आता आदेश काढत बाधित शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या अग्रिम मदतीमधून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये, अशी सक्त ताकीद जिल्ह्यातील सर्व बँकांना दिली आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा झाल्यानंतर ती रक्कम होल्ड अथवा कपात केल्यास कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अग्रिम मदतीसह नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी प्राप्त होणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात दिलासा देण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे हे अनुदान बाधित शेतकऱ्यांना विनाअडथळा उपलब्ध करून द्यावे. सदर रक्कम बँक खात्यावर होल्ड ठेवणे अथवा रक्कम काढण्यास प्रतिबंध करण्यास मनाई आहे. यापूर्वी अशाप्रकारे रक्कम वळती केली असल्यास किंवा खात्यावर होल्ड ठेवली असल्यास अशा प्रकरणांची तपासणी करून लागू नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. --- कोट जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना मिळणारी अग्रिम मदत कर्जखात्यात वळती करू नये. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व इतर बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना या निर्देशांची माहिती देत त्याचे काटेकोर पालन करावे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या बँकावर लागू कायदे व नियमांनुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल. - रोहितकुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी.
Read Entire Article