‘किम्स मानवता’मध्ये पहिले ''स्वॅप पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट''

2 days ago 2
ARTICLE AD
फोटो -NSK26H33811 नाशिक : डॉ. राज नगरकर, डॉ मोहन पटेल, डॉ. उमा महेश्वरराव, डॉ. किशोर वाणी, डॉ. किरणदीप संधू. ‘किम्स मानवता’मध्ये पहिले ''स्वॅप पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट'' -------------------------- दोन रुग्‍ण व कुटुंबीयांना दिलासा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पहिले ''पेअर्ड किडनी एक्स्चेंज (स्वॅप) ट्रान्सप्लांट'' यशस्वीरीत्या पूर्ण केले. किडनी निकामी झालेल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील दोन रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्य मिळाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. रुग्‍णालयाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ.राज नगरकर म्‍हणाले, की नाशिकमध्ये पहिले स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी करणे हा अभिमानाचा क्षण आहे. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार त्यांच्या शहरात मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वैद्यकीय संचालक तथा प्रत्यारोपण तज्‍ज्ञ डॉ. मोहन पटेल यांच्या नेतृत्वाखाली शस्‍त्रक्रिया पार पडली. किडनी ट्रान्सप्लांट सर्जन व युरॉलॉजिस्ट डॉ. उमा महेश्वरराव, डॉ. किशोर वाणी, डॉ. परीक्षित महाजन, भूलतज्ज्ञ डॉ. किरणदीप संधू, ट्रान्सप्लांट समन्वयक रुपेश देवरे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. मोहन पटेल म्हणाले, की मूत्रपिंड निकामी झालेल्‍या रुग्‍णांपैकी काहींकडे कुटुंबात दाता उपलब्ध असतो. परंतु सुसंगततेच्या अडचणीमुळे तो दान करू शकत नाही, अशांसाठी स्वॅप ट्रान्सप्लांट हा प्रभावी पर्याय आहे. या प्रकरणात दोन्ही रुग्णांना अधिक सुसंगत मूत्रपिंड मिळाल्या. पहिल्या कुटुंबातील पत्नी आपल्या पतीला मूत्रपिंड देण्यास तयार होती, मात्र तपासणीत दोघांचे रक्तगट जुळले नाही. दुसऱ्या कुटुंबातील आई मुलीला मूत्रपिंड देण्यास तयार होती, परंतु तिथेही वैद्यकीय अनुकूलता नव्हती. ही दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत नव्हती. तरीही वैद्यकीय तपासणीत त्यांच्यात परस्पर जुळणी आढळली. त्यानुसार पहिल्या कुटुंबातील पत्नीने दुसऱ्या कुटुंबातील मुलीला, तर दुसऱ्या कुटुंबातील आईने पहिल्या कुटुंबातील पतीला मूत्रपिंड दान केले. डॉ. किशोर वाणी म्हणाले, एकाच वेळी दोन्ही प्रत्‍यारोपण अर्थात चार शस्‍त्रक्रिया एकाच वेळी कराव्‍या आगतात. किम्‍स मानवता हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या शल्‍यचिकित्‍सक व तज्‍ज्ञांच्‍या टीममुळे ही यशस्‍वी कामगिरी करता आली.
Read Entire Article