गाढवाचा मनोरंजनासाठी बेकायदेशीर वापर केल्याने गुन्हा

1 week ago 2
ARTICLE AD
गाढवाचा मनोरंजनासाठी बेकायदेशीर वापर केल्याने गुन्हा कालिका देवी यात्रोत्सवातील प्रकार : प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे सुटका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : नवरात्रोत्सवामुळे सुरू असलेल्या श्री कालिका देवी यात्रोत्सवामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली गाढवाचा अमानुषपणे आणि बेकायदेशीर वापर करणाऱ्या संशयिताविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे गाढवाची सुटका करण्यात आली असून त्याला गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. पांडवलेणी परिसरातील मंगलरूप गोशाळेचे संचालक व मानक पशुकल्याण अधिकारी पुरुषोत्तम दगू आव्हाड (३५, रा. मोरवाडी, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १९) ते कालिका देवी यात्रोत्सवात आले असता, त्यांना संदीप हॉटेलसमोर पाळण्यांच्या भागात एका गाढवाला अमानुषपणे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. या गाढवाचा वापर यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी केला जात होता. आव्हाड हे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी डॉ. वैभव आहेर, प्राणीमित्र आदित्य पडोळ, कृष्णा मुंढे, किरण मोरे, प्रसाद जाऊंजळ यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान तेथे ''पन्नालाल का जलवा'' असे पोस्टर लावून यात्रेकरूंकडून पैसे गोळा केले जात असल्याचे आढळले. ​पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, मनोरंजनासाठी गाढवाचा वापर करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ''डायल ११२'' वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण करण्यात आले. याप्रकरणी गोविंद राजू भट्ट (रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी, पुणे) याच्याविरोधात मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गाढव ताब्यात घेऊन पुढील संगोपनासाठी मंगलरूप गोशाळा, पांडव लेणी येथे दाखल केले आहे.
Read Entire Article