चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जिवेठार मारणाऱ्यास जन्मठेप

6 days ago 3
ARTICLE AD
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप सकाळ वृत्तसेवा नंदूरबार, ता. २४ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस शहादा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अ. वि. गुजराथी यांनी जन्मठेपेची शिक्षा तसेच १३ हजार रूपयांचा दंड ठोठावला. विलास अंबर ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी जतनबाई भ्र. दंगल माळी (वय ६८) यांची मुलगी राधाबाई हिचा विवाह विलास अंबर ठाकरे याच्यासोबत झाला होता. विलासला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नी राधाबाईकडे तो पैसे मागत असे. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत असत. २७ ऑगस्ट २०१८ रोजी विलासने त्याच्या राहत्या घरी राधाबाईस लोखंडी भाल्याने मारून जखमी केले. यात राधाबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहादा पोलिसात आरोपी विलास ठाकरेवर गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास शहादा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिपक बागुल यांनी करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, शहादा येथे दोषारोप पत्र सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी शहादा अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ श्री. अ. वि. गुजराथी यांच्यासमक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे महत्वाच्या साक्ष तपासण्यात आल्या. सबळ पुराव्याच्या आधारे विलास ठाकरेविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने न्यायालयाने जन्मठेप व एकुण १३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंह गिरासे यांनी पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक योगिता राठोड, विनोद पाटील, पैरवी अंमलदार गणेश सावळे, देविदास सुर्यवंशी, प्रवीण पटेल, शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिले.
Read Entire Article