दहावी, बारावी परीक्षा अर्जाची ३१ पर्यंत मुदत

1 week ago 2
ARTICLE AD
दहावी, बारावी परीक्षा अर्जाची ३१ पर्यंत मुदत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२१ : कोरड्या दुष्काळाच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍य शासनाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. बहुतांश विद्यार्थ्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या वेळापत्रकानुसार पात्रताधारक विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली आहे. नाशिक विभागातील ५४ पैकी ५२ तालुक्‍यांचा समावेश केला असल्‍याने, तेथील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्‍क माफ होणार आहे. नाशिक व दिंडोरी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना सद्यःस्‍थितीत तरी सशुल्‍क अर्ज भरावा लागणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विहित मुदतीत शाळांकडून अपेक्षित गतीने आवेदनपत्रे भरली न गेल्यास ऐनवेळी सर्व्हरवर तांत्रिक ताण येऊन अडचणी निर्माण होतात. शिवाय विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारेच गोपनीय साहित्याचा पुरवठा केला जात असल्याने ही कालमर्यादेत प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भातील महत्त्वाच्‍या सूचना यापूर्वीच जाहीर केल्‍या आहेत. सद्यःस्‍थितीत बहुतांश विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले आहेत. दुष्काळी पार्श्वभूमीवरील निर्णय नुकताच काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असल्‍याने त्‍याआधी अर्ज दाखल केलेल्‍या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शुल्‍क परत मिळणार आहे. अर्ज दाखल करण्याचे महत्त्वाचे टप्पे - नियमित शुल्कासह मुदत (दहावी, बारावी) : ३१ ऑक्‍टोबरपर्यंत - विलंब शुल्कासह मुदत : १ ते १५ नोव्हेंबर - अतिविलंब शुल्कासह मुदत : १६ ते ३० नोव्हेंबर
Read Entire Article