दिवाळीपूर्वी टँकरचा फेऱ्या वाढणार

3 days ago 2
ARTICLE AD
दिवाळीपूर्वी टँकरच्या फेऱ्या वाढणार ९१९ गावे टंचाईच्या छायेत ः जिल्ह्यात ५५ गावे-वाड्यांना पाणीपुरवठा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : दुष्काळाने अवघा जिल्हा होरपळून निघत असून ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. जिल्ह्यात सध्या दोन तालुक्यातील ५५ गावे-वाड्यांना १५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवाळीपूर्वी आणखीन काही गावांमध्ये टँकर सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाच्या आराखड्यानुसार ९१९ गावे टंचाईच्या छायेत आहेत. --------------- जिल्ह्यात यंदा पावसाने प्रदीर्घ काळ खंड दिल्याने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना ग्रामीण भागात आता पाण्याचे संकट अधिक गडद होऊ लागले आहे. जिल्ह्यात सध्या मालेगाव आणि येवला या दोन तालुक्यात टँकरचा फेरा सुरु आहे. या दोन्ही तालुक्यात ५५ गावे-वाड्यांना पंधरा टँकरद्वारे पाणी पोहचविण्यात येत आहेत. दिवसभरात टँकरच्या तीस फेऱ्या होतात, त्यातून ३७ हजार ७१४ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. टॅंकर भरण्यासाठी प्रशासनाने सात विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात सध्या उनही वाढले आहे. तापमानाचा पारा आताच ३५ अंशावर स्थिरावला आहे. वाढत्या तापमानासोबत दुष्काळाच्या झळाही वाढत आहेत. परिणामी तालुका प्रशासनाकडे टँकरसाठी प्रस्ताव दाखल होत आहेत. दिवाळीपूर्वी देवळ्यासह इतर काही तालुक्यात टँकर सुरु होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आता तयारीवर भर दिला आहे. --- ९१९ गावे टंचाईच्या छायेत जिल्ह्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती बघता जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार ९१९ गावांना संभाव्य टंचाईचा झळा बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मालेगावमधील सर्वाधिक १२५ गावे आहेत. तसेच येवला १११, चांदवड १०२, कळवण १००, इगतपुरी ९५, सिन्नर ९३, नांदगाव ८४, पेठ ५९, देवळा ४४, बागलाण ४२, निफाड २४, सुरगाणा १६ तसेच दिंडोरी व नाशिकमधील प्रत्येकी १२ गावांचा समावेश आहे. याशिवाय मागणीनुसार वाड्या-वस्त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
Read Entire Article