धनादेश अनादर प्रकरणात जिल्‍हा न्यायालयाचा दणका

1 day ago 2
ARTICLE AD
धनादेश अनादर प्रकरणी तुरुंगवास अन्‌ ८ लाखांचा दंड --- जळगाव जिल्‍हा न्यायालयाचा दणका सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : मित्राचा विश्वासघात करून खोटा धनादेश देणाऱ्याला जळगाव न्यायालयाने दणका दिला आहे. धनादेश अनादर प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. एम. पवार यांनी आरोपीला एक वर्षाचा तुरुंगवास आणि आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल दिला. फुपनगरी (ता. जि. जळगाव) येथील ज्ञानेश्वर बडगुजर आणि शेगाव (जि. बुलढाणा) येथील आरोपी गोकुळ खाडे मित्र होते. विश्वासाचा फायदा घेत खाडे याने १ मार्च २०२२ ला बडगुजर यांच्याकडून ६ लाख ७० हजार रुपये हातउसनवार घेतले होते. रक्कम परत मागितल्यावर संशयिताने २८ ऑक्टोबर २०२४ ला पाच लाख ५० हजार रुपयांचा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा धनादेश दिला. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने १२ नोव्हेंबर २०२४ ला धनादेश वटला नाही. यामुळे बडगुजर यांनी २३ नोव्हेंबर २०२४ ला वकिलामार्फत खाडेला कायदेशीर नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही आरोपीने दुर्लक्ष केल्याने अखेर न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजूंचे साक्षीदार आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीच्या बाजूने निकाल दिला. कलम १३८ नुसार आरोपी गोकुळ खाडे याला दोषी ठरवत १ वर्षाचा कारावास व ८ लाखांच्या नुकसानभरपाईची शिक्षा सुनावली. नुकसानभरपाई न दिल्यास अतिरिक्त ३ महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे. फिर्यादीतर्फे ॲड. हेमंत गिरणारे व ॲड. रघुनाथ गिरणारे यांनी काम पाहिले.
Read Entire Article