Parbhani soybean News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) मोठ्या संकटात सापडले आहेत. कारण पावसानं दडी मारल्यामुळं खरीपाची पिकं (Kharif crops) धोक्यात आली आहेत. तर काही ठिकाणी खरीपाची पिके करपली आहेत. अशीच स्थिती परभणी जिल्ह्यात देखील आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर (soybean नांगर फिरवला आहे. पावसाअभावी सोयाबीन वाळून गेल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतलाय. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक इथं हा प्रकार घडला आहे.

परभणी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली

परभणी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन पीक वाळून चालले आहे. त्यामुळं उत्पादनाची आशा मावळलेल्या एका शेतकऱ्याने तब्बल 10 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर नांगर फिरवला आहे.

पीक वाचण्याची शक्यता कमी झाल्याने सोयाबीनवर फिरवला नांगर

परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील हा प्रकार समोर आला आहे. शेतकरी मंगलबाई दत्तराव हिक्के यांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र पीक वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारली. परिणामी पिकाला आवश्यक ओलावा मिळाला नाही आणि सोयाबीन वाळू लागले. पिकाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने शेतकऱ्यासमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पीक वाचण्याची शक्यता कमी झाल्याने अखेर नाईलाजाने त्याने 10 एकर सोयाबीनवर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी

एका बाजूला लागवडीसाठी झालेला खर्च आणि दुसऱ्या बाजूला हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाअभावी केवळ एका शेतकऱ्याचीच नव्हे, तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत. ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने साथ सोडल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पावसाळा सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहगे. तरीदेखील राज्याच्या अनेक भागात पाऊस नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया चालली आहे. तर अनेक ठिकाणी जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाली आहे.