​बेकायदेशीर स्त्रीबीज विक्री रॅकेटवर ''ईडी''ची धाड

1 week ago 3
ARTICLE AD
​बेकायदेशीर स्त्रीबीज विक्री रॅकेटवर ‘ईडी’चा छापा नाशिक, ठाणे अन् बारामतीत ‘सर्च ऑपरेशन’ : ​२९ लाखांची रोकड जप्त सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : गोरगरीब महिलांच्या लाचार आणि आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीरपणे स्त्रीबीज काढून त्यांची विविध आयव्हीएफ सेंटर आणि एआरटी बँकांना विक्री करणाऱ्या मोठ्या संघटित रॅकेटचा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पर्दाफाश केला. या कारवाईअंतर्गत मुंबई ‘ईडी’च्या पथकाने नाशिक, ठाणे आणि बारामती येथील रुग्णालय व आयव्हीएफ सेंटरसह दहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत २९ लाखांची रोकड जप्त केली असून, अनेक बँक लॉकर्स आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक गोठवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (पूर्व) पोलिस ठाण्यात मंजूषा वानखेडे व इतर १६ जणांविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि आरोपपत्राच्या आधारे ‘ईडी’ने ही चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (नियमन) कायदा आणि औषधे व प्रसाधने कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले होते. तपासाअंती एजंट्सच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात होते. या महिलांचे स्त्रीबीज काढून ते विविध आयव्हीएफ सेंटर व एआरटी बँकांना पुरवले जायचे. या मोबदल्यात एजंट्सना मोठे कमिशन मिळत होते. महिलांची खरी ओळख लपवण्यासाठी आणि एकाच महिलेकडून वारंवार स्त्रीबीज काढून घेण्यासाठी एजंटकडून बनावट आधारकार्ड, संमतीपत्रे, प्रतिज्ञापत्रे, जन्मदाखले, पॅनकार्ड, रक्त तपासणी अहवाल आणि विमा कागदपत्रे तयार केली जात होती. महिला वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे खोटे अहवाल बनवून त्यांना महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील विविध केंद्रांमध्ये पाठवले जात होते. ज्यामुळे या महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. ​ कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे ‘ईडी’ने गेल्या १६ तारखेला एकावेळी नाशिक, बारामती आणि ठाणे येथील दहा रुग्णालये व आयव्हीएफ सेंटरवर छापे टाकले. या कारवाईत ‘ईडी’ने २९ लाखांच्या रोकडसह डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह दस्तऐवज हस्तगत केले आहेत. तसेच, बँक लॉकर व म्युच्युअल फंड गुंतवणूक गोठविण्यात आली असून, स्थावर मालमत्तांची ओळख पटवली आहे. ‘ईडी’च्या तपासादरम्यान काही नवीन एजंटची नावे समोर आली असूनस, पुढील तपास वेगाने सुरू आहे.
Read Entire Article