राज्यातील ५८८ आश्रमशाळांचे ऑडिट : उईके

6 days ago 3
ARTICLE AD
राज्यातील ५८८ आश्रमशाळांचे ऑडिट मंत्री उईके : समिती अहवालानंतर सेंट्रल किचन बंदचा निर्णय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्यू, असुविधा आणि सातत्याने घडणाऱ्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५५८ अनुदानित शाळांच्या थर्ड पार्टी ऑडिटच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. समितीच्या अहवालानंतर सेंट्रल किचन बंदचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक दौऱ्यावर असलेले मंत्री उईके यांनी शनिवारी (ता. २४) शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील आश्रमशाळांमधील असुविधांचा मुद्दा वारंवार पुढे येत असून, त्या संदर्भात तक्रारी प्राप्त होतात. राज्यात ५०० शासकीय व ५५८ अनुदानित आश्रमशाळा आहेत. अनुदानित शाळांमध्ये थेट कारवाईपूर्वी संस्थाचालकांना विश्वासात घ्यावे लागते. त्यामुळे सर्व अनुदानित शाळांचा शैक्षणिक दर्जा, निवासव्यवस्था, भोजन, आरोग्य सुविधा, सुरक्षा आणि अनुदानाच्या वापराच्या अनुषंगाने ऑडिट केले जाईल. या ऑडिटमधून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीनुसार त्रुटी असल्यास कायद्यात सुधारणेचा मार्ग मोकळा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आश्रमशाळांमधील सेंट्रल किचनबाबत दोन समित्या नेमल्या आहेत. एका समितीचा अहवाल आला असून, दुसऱ्या समितीचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे लगेचच सेंट्रल किचन बंद करणे योग्य नाही. पण, तरीही आश्रमशाळा व सेंट्रल किचनमधील अंतर कमी करून १० ते २५ मिनिटांत विद्यार्थ्यांना जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री उईके यांनी सांगितले. विद्यार्थी आंदोलनावर तोडगा नाशिक, पुणे तसेच नागपूर येथे ऑगस्ट महिन्यात आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामध्ये वसतिगृह वयोमर्यादा रद्द करणे, अधिसंख्य पदे भरणे, पेसांतर्गत १७ पैकी ९ संवर्गांची भरती सुरू करणे, बिंदुनामावलीसाठी समिती आणि डीबीटी रद्द करून नवीन अध्यादेश काढण्याबाबतच्या निर्णयांचा समावेश असल्याचे मंत्री उईके यांनी सांगितले. आश्रमशाळेतील मुले आपलीच : उईके आश्रमशाळांतील वार्तांकनापासून माध्यमांना रोखले जात असल्याबाबत मंत्री उईके यांचे लक्ष वेधण्यात आले. उईके यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना आश्रमशाळेत आपलीच मुले-मुली राहतात. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही निर्बंध घालण्यात आले. या वेळी आश्रमशाळांमध्ये त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य करताना मुलामुलींच्या सुरक्षेसाठी काही निर्बंध लावल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याचा आढावा घेतो, असे सांगताना मुलींच्या प्रेग्नन्सी टेस्ट केल्या जात नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
Read Entire Article