रामघाट, पंचवटी परिसरातील मद्यविक्री दुकानांवर निर्बंधांचा बडगा?

1 week ago 3
ARTICLE AD
पंचवटी परिसरातील मद्यविक्री दुकानांवर निर्बंधांचा बडगा? सिंहस्थ कुंभमेळा : त्र्यंबकेश्वर, नाशिक प्रशासनाकडे मागितला अहवाल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचे धार्मिक पावित्र्य, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पवित्र पर्वादरम्यान रामतीर्थ, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्रीची दुकाने नेमकी किती अंतरापर्यंत आणि किती काळासाठी बंद ठेवायची, याबाबत जिल्हा प्रशासनाने त्र्यंबक पालिका व नाशिक महापालिकेकडे तातडीने सुस्पष्ट अभिप्राय मागितला आहे. यामुळे कुंभमेळा क्षेत्रात मद्यविक्रीवर निर्बंधांचा मोठा निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्याबाबत गंभीर चर्चा झाली होती. कुंभमेळ्यात देशा-परदेशातून लाखो भाविक, वारकरी व साधू-महंत दाखल होणार आहेत. या प्रचंड गर्दीच्या काळात नागरिकांची सुरक्षा, स्वच्छता आणि धार्मिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी रामतीर्थ व पंचवटी परिसरातील दोन ते तीन किलोमीटरच्या परिघातील मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम १३९ मधील तरतुदींनुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडून यावर तातडीने शिफारसी व मते मागवली आहेत. महापालिका प्रशासनाच्या अभिप्रायानंतर शासन स्तरावरून याबाबत अंतिम अधिसूचना जारी केली जाणार असून, मद्यविक्री व्यावसायिकांचे या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. या मुद्यांवर मागविला अहवाल शासनाकडून मागविण्यात आलेल्या अंतिम अहवालासाठी प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आहेत. रामतीर्थ, पंचवटी व कुशावर्त तलाव परिसरातील नेमक्या किती किलोमीटरच्या परिसरातील मद्यविक्रीची दुकाने (अनुज्ञप्त्या) बंद ठेवावीत, याचे अचूक अंतर, तसेच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हे निर्बंध नेमक्या किती कालावधीसाठी लागू राहावेत, या दोन मुद्द्यांवर स्पष्ट अहवाल शासनाने मागतीला आहे. या अहवालांनंतरच मद्यविक्री दुकानांवरील निर्बंध घातले जाणार आहेत.
Read Entire Article