रुग्णवाहिका अडवून मृतदेहाची विटंबना

2 days ago 3
ARTICLE AD
रुग्णवाहिका अडवून मृतदेहाची विटंबना --- विंचूर चौफुलीजवळ चौघांना मारहाण करून दागिने लांबवले सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ ः जुन्या वादाच्या आणि पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीच्या रागातून काही जणांनी रुग्णवाहिका अडवून मृतदेहाची विटंबना केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना विंचूर (ता. धुळे) चौफुलीजवळ घडली. या प्रकरणी संशयितांनी महिला आणि तिच्या पतीसह चौघांना बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने हिसकावून घेतले असून, या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नंदुरबार येथील पटेलवाडीतील ५८ वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार, त्या आणि त्यांचे पती अशोक प्रकाशकर २६ ला रात्री पावणेनऊच्या सुमारास रुग्णवाहिकेने जात होते. यादरम्यान, धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचूर शिवारातील चौफुलीजवळ पल्लवी रवींद्र प्रकाशकर, छायाबाई रवींद्र प्रकाशकर आणि सागर रवींद्र प्रकाशकर (सर्व रा. डोंगरगाव रोड, दूरदर्शन केंद्राच्या बाजूला, शहादा, जि. नंदुरबार) यांनी त्यांची रुग्णवाहिका अडवली. मारहाणीची घटना संशयितांनी रुग्णवाहिका थांबविल्यानंतर फिर्यादी महिला, त्यांचे पती आणि त्यांच्या दोन नंदांना शिवीगाळ करत हातबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी फिर्यादीचा उजवा खांदा धरून त्यांची साडी ओढत लज्जास्पद कृत्य केले. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील ३३ ग्रॅमची सोन्याची पोत आणि १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, असा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाची चावी आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत, रुग्णवाहिकेत ठेवलेल्या मृतदेहाचे पाय ओढून अमानुषपणे विटंबना करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. उपनिरीक्षक प्रभावती कापसे तपास करीत आहेत.
Read Entire Article