शहरी आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल

1 day ago 2
ARTICLE AD
पान तीन सेकंड मेन --------------- शहरी आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल प्राथमिक आरोग्य सेवेचे तेरा प्रकार सक्तीचे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राज्यात सुरू असलेल्या नागरी आरोग्य संस्थांची गुणवत्ता वाढवण्यासाठी नाशिक महापालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य सेवेत तेरा प्रकार सक्तीचे करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेबाबत कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व चिकित्सालये व नागरी समुदाय आरोग्य केंद्रे आणि राज्य योजनेतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या संस्थांमधून १३ प्रकारच्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक असणार आहे. या सेवांसोबतच गुणात्मक व परिणामकारक सेवेसाठी व्यापक समुदाय सहभाग, क्षमता वर्धन व प्रशिक्षण, औषधे, प्रयोगशाळा तपासणी, मनुष्यबळ, वित्त, प्रभाग व शहर आरोग्य कृती आराखडा आणि सक्षम पर्यवेक्षण आवश्यक करण्यात आले आहे. यासाठी महिला आरोग्य समित्या, जन आरोग्य समित्या, रुग्ण कल्याण समित्या, शालेय आरोग्य दूत, बचत गट आणि रहिवासी संघांचा सहभाग वाढवणे महत्त्वाचे मानले आहे. त्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य केंद्रांवर किमान १५० आणि आयुष्मान आरोग्य मंदिर व आपला दवाखाना याठिकाणी किमान १०० दैनंदिन बाह्यरुग्ण सेवा देण्याचे इष्टांकही निश्चित करण्यात आला आहे. ------------- सक्तीच्या १३ सेवा - गरोदरपण व बाळंतपणातील काळजी. - नवजात शिशू व बाळांच्या आरोग्य सेवा. - बालपण व किशोरवयीन आरोग्य सेवा. - कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य सेवा. - सामान्य संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन व बाह्यरुग्ण सेवा. - तीव्र साध्या आजारांसाठी व किरकोळ आजारांसाठी काळजी. - असंसर्गजन्य रोगांची तपासणी व व्यवस्थापन. - सामान्य नेत्ररोग व नाक-कान-घसा समस्यांसाठी काळजी. - मूलभूत मौखिक आरोग्य सेवा. - वृद्ध व उपशामक आरोग्य सेवा. - भाजणे व अपघातासह आपत्कालीन सेवा. - मानसिक आरोग्य तपासणी. - योग व वेलनेस सेवा.
Read Entire Article