Solapur: सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट गडद झालं असून, अनेक गावांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. जिल्ह्यात तब्बल 140 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, 2 लाख 74 हजारांहून अधिक नागरिकांसह हजारो पशुधनाची तहान भागवण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यातील 142 गावं आणि 752 वाड्यांमधील 2 लाख 74 हजार 743 नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. याशिवाय 96 हजार 916 पशुधनासाठीही पाण्याची व्यवस्था केली जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.

मंगळवेढा, सांगोल्यात सर्वाधिक टँकर

तालुकानिहाय आकडेवारी पाहिली, तर मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक 40 टँकरद्वारे 37 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. सांगोला तालुक्यात 26 गावांसाठी 34 टँकर सुरू आहेत. माढा तालुक्यात 14 गावांसाठी 16, तर अक्कलकोट तालुक्यातील 16 गावांसाठी 9 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

बार्शी तालुक्यात 13 गावांसाठी 3, करमाळ्यात 12 गावांसाठी 9, तर माळशिरस तालुक्यातील 10 गावांसाठी 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उत्तर सोलापूरमधील 6 गावांसाठी 9, दक्षिण सोलापूरमधील 6 गावांसाठी 8 आणि मोहोळ तालुक्यातील 2 गावांसाठी 2 टँकर सुरू आहेत. विशेष म्हणजे, पंढरपूर तालुक्यात सध्या एकही टँकर सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

61 जलस्रोत अधिग्रहित

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील 40 विहिरी आणि 21 बोअरवेल असे एकूण 61 जलस्रोत अधिग्रहित केले आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी ही माहिती दिली.

एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असताना, दुसरीकडे मोठ्या संख्येने पशुधनाची तहान भागवण्याची जबाबदारीही प्रशासनावर आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणं महत्त्वाचं ठरत आहे.