सोशल मिडीयापासून दूर, अभ्यासावर केंद्रित केले लक्ष

1 week ago 3
ARTICLE AD
H33406 नाशिक : सीए इंटरमिजिएट परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविल्‍यानंतर जल्‍लोष करताना साक्षी चांडक हिच्‍यासह कुटुंबीय, मार्गदर्शक व मित्र परीवार. -------------------- सोशल मिडीयापासून दूर, अभ्यासावर केंद्रित केले लक्ष सीए इंटरमिजिएट परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल साक्षी चांडकने सांगितले यशाचे गमक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ : आपणही सनदी लेखापाल (सीए) व्‍हायचे, असा निश्‍चय साधारणतः दहावीनंतर केला होता. त्‍यादृष्टीकोनातून परीश्रम घेण्यास सुरुवात केली. सोशल मिडीयासह इतर सर्व अडथळे दूर ठेवत केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. शिकवणी व नंतर स्‍वयंअध्ययन असा दिवसभरातील बहुतांश वेळ अभ्यासासाठी दिला. आता यापुढील टप्‍यात अंतिम परीक्षेतही राष्ट्रीय क्रमवारीत स्‍थान मिळवत यश मिळविण्याचे ध्येय असल्‍याची प्रतिक्रिया साक्षी चांडक हिने ‘सकाळ’ शी बोलताना दिली. गुरुवारी (ता.२३) जाहीर झालेल्‍या निकालात साक्षीने ‘सीए इंटरमीडिएट’ सप्टेंबर २०२६ परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकासह यश मिळविले. यानिमित्त तिच्‍याशी संवाद साधला असता, विद्यार्थ्यांसाठीदेखील उपयुक्‍त टिप्‍स तिने दिल्‍या. इगतपुरी तालुक्‍यातील रहिवासी असलेल्‍या साक्षी चांडक हिचे वडील प्रकाश चांडक यांचा इगतपुरी येथे कापड विक्रीचा व्यवसाय असून आई पूनम चांडक या गृहिणी आहेत. कुटुंबात व्यवसाय पार्श्वभूमी असतानाही साक्षीने दहावीनंतर सीए क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला. तिचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएससी बोर्डातून इगतपुरीत झाले. त्यानंतर अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी ती नाशिकच्या बीवायके महाविद्यालयात दाखल झाली. शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या साक्षीने दहावीत अव्वल तर बारावीत महाविद्यालयातून चौथा क्रमांक मिळवला होता. यानंतर २०२५ मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षेतही तिने देशात चौथा क्रमांक पटकावला होता. इन्‍फोः तब्‍बल १४ तास अभ्यास अभ्यास पद्धतीविषयी माहिती देताना साक्षी म्‍हणाली, की माइंड स्‍पार्क येथे शिकवणी सुरू असताना रोज १० तासांचे लेक्चर्स आणि त्यानंतर ५ ते ६ तास स्वयंअध्ययन केले. तर परीक्षेच्या आधी शेवटच्या चार महिन्यांच्या काळात रोज १२ ते १४ तास कसून अभ्यास केला. सोशल मीडियामुळे अभ्यासामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून विविध सोशल मीडिया ॲपपासून अंतर ठेवल्‍याचेही साक्षीने आवर्जुन सांगितले. कोट सीए फाउंडेशनमध्ये चौथा आणि आता इंटरमध्ये देशात पहिला क्रमांक आल्यानंतर सीए फायनलमध्येही चांगल्‍या कामगिरीसह यश मिळवायचे आहे. ‘कर्म करत राहा, फळ आपोआप मिळेल.’ यावर माझा दृढ विश्‍वास आहे. माझ्या यशात कुटुंबाची खंबीर साथ अतिशय मोलाची ठरली. - साक्षी चांडक. इन्‍फो साक्षीने विद्यार्थ्यांसाठी दिलेल्‍या टिप्‍स... - अभ्यासाची सुरुवात पहिल्या दिवसापासून करा. बॅकलॉग राहणार नाही, याची काळजी घ्या. - अभ्यासाचे काटेकोर वेळापत्रक बनवा. सातत्य व कठोर परिश्रमावर भर द्या. - सराव करताना किंवा चाचण्यांमध्ये होणाऱ्या चुका स्वतंत्र वहीत नोंदवा. जेणेकरून त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. - सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होते; त्यामुळे अभ्यासादरम्‍यान मोबाईल फोन स्वतःजवळ ठेवू नका. - शिकवणीनंतर किमान ५ ते ६ तास आणि परीक्षापूर्व सुटीच्या काळात रोज १२ ते १४ तास नियमित स्वयंअध्ययन करा.
Read Entire Article