२ दिवाळी अंक -नंदुरबारच्या दोन श्रध्दास्थानांची यात्रा

9 hours ago 4
ARTICLE AD
धार्मिक पर्यटन फोटो : NSK26H32038 (शिंदे गावाची उमज माता) फोटो : NSK26H32039 (नंदनगरीची माता खोडाई माता) फोटो : NSK26H32033 ( गजेंद्र शिंपी पासपोर्ट) ------------------------ उमज माता आणि खोडाईमाता ------------------------------ नंदुरबारच्या दोन श्रद्धास्थानांची यात्रा नंदुरबार तालुक्यातील शिंदे गावाची उमज माता आणि नंदनगरीची खोडाईमाता या ग्रामदेवता श्रध्दा, परंपरा, लोकसंस्कृती आणि बदलत्या काळाचा जिवंत वारसा बनल्या आहेत. या दोन्ही ग्रामदेवतांचा यात्रोत्सव मोठ्या स्वरूपात भरत असतो. यातून लोकपरंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडत असते. पारंपरिक लोककलांचे जतन होत असते. शिंदे गावातील उमज माता देवस्थान भाविकांचे विशेष श्रद्धास्थान मानले जाते. - गजेंद्र शिंपी, नंदुरबार स्थानिक परंपरेनुसार शिंदे गावापासून पश्‍चिमेला वडगाव शिंदे गावालगत असलेल्या एका वाहत्या प्रवाहाजवळ उमज मातेची स्वयंभू पाषाणमूर्ती आढळल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या मूर्तीची स्थापना करण्यात आली. लोकपरंपरा आणि तगतराव मिरवणूक उमज मातेच्या यात्रेत पारंपारिक पद्धतीने तगतरावाची मिरवणुक काढली जाते. यामुळे यात्रेला धार्मिकतेसोबतच लोकपरंपरेचे स्वरुप प्राप्त होते. याच काळात सोंगाड्या पार्टी आयोजित केली जाते. कलाकार विविध सोंगे आणि कलाप्रकार सादर करून लोकांचे मनोरंजन करतात. लोकांमध्ये ग्रामीण सांस्कृतिक स्मृती जिवंत राहतात. तमाशाच्या फडांनी गाजलेली यात्रा पूर्वी यात्रेत तमाशांचे फड गावकऱ्यांचे आकर्षण असायचे. महाराष्ट्रात प्रसिद्धीला आलेले विविध कलाकारांचे कार्यक्रम याठिकाणी व्हायचे. या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. महाराष्ट्राच्या लोककला आणि तमाशा परंपरेला व्यासपिठ देणारी ही यात्रा सर्वाच्या स्मरणात राहणारी असते. बैल-घोडयांचा बाजार उमज माता यात्रेनिमित्त पूर्वी पशुधनाचा बाजार भरायचा. यात्रेत बैल आणि घोड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी - विक्री होत असे. ज्येष्ठ नागरिक याबाबतच्या आठवणी सांगतात. मात्र आता काळ बदलला असून शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने बैल आणि घोड्यांच्या बाजाराचे महत्त्व कमी झाले आहे. मात्र यात्रेचे व्यापारी स्वरूप आजही कायम आहे. भांडी, कपडे, घरगुती वस्तु, खेळणी, खाद्यपदार्थ आणि विविध संसार उपयोगी वस्तुंची दुकाने यात्रेत थाटली जातात. ग्रामिण अर्थव्यवस्थेशी नाते उमज माता यात्रा ही ग्रामीण जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. यात्रेपूर्वी शेतकरी शेताची महत्त्वाची कामे पूर्ण करतात. शेतमजुरांच्या हातात या काळात मिळणारे पैसे आणि रोजगार यामुळे यात्रेच्या दिवसात कुटुंबाच्या खर्चाला चालना मिळते. यात्रेत खरेदी - विक्री वाढते. स्थानिक व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांना व्यवसायाची संधी मिळते. खाद्य पदार्थ विक्रेत, खेळणीवाले, कपड्यांचे व्यापारी, फोटोग्राफर आणि विविध प्रकारचे छोटे - मोठे व्यापारी यांच्यासाठी यात्रा महत्त्वाची ठरते. फोटोग्राफीपासून झुले, पाळणांपर्यंत एके काळी यात्रेत फोटो काढणे विशेष आठवण मानली जात असे. संपुर्ण कुटूंबाने एकत्र फोटो काढुन घेणे हा यात्रेचा अविभाज्य भाग होता. आजही यात्रेतील छायाचित्रांचे आकर्षण कायम आहे. त्याचप्रमाणे मोठे झुले, पाळणे विविध मनोरंजनाची साधने, खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि हॉटेल्स यामुळे यात्रेचे स्वरूप व्यापक झाले आहे. उमज माता यात्रा धार्मिकतेसोबतच मनोरंजन, व्यापार आणि सामाजिक भेटी - गाठीचा उत्सव बनली आहे. नंदुरबारची खोडाईमाता - नवरात्रीत भक्तीचा जागर नंदुरबार शहरातील खोंडाईमाता यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे. नवरात्रीत नंदुरबार शहरातील खोडाईमाता, वाघेश्वरी माता आणि इतर देवीस्थानांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्रीत खोडाईमाता मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ सुरु होते. पहाटे ४ वाजताच भाविक दर्शनसाठी येत असतात. काकड आरती, पुजाअर्चा, अभिषेक आणि देवी दर्शनामुळे परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण असते. सायंकाळी आणि रात्री भाविकांच्या गर्दीत आणखी वाढते. शिळेच्या स्वरुपातील देवीची परंपरा खोडाईमाता देवस्थानाचे वैशिष्ट म्हणजे, येथे दगड अथवा शिळेच्या स्वरुपातील देवीची पुजा करण्याची परंपरा आहे. मूर्तीच्या पारंपारिक स्वरूपापेक्षा शिळेलाच देवीचे स्वरूप म्हणुन पुजण्याची पध्दत आहे. लोकदेवतेच्या प्राचीन उपासनेची आठवण करून देणारी आहे. खोडाईमाता मंदिराला सुमारे ८०० ते ९०० वर्षापूर्वीची परंपरा असल्याची स्थानिक मान्यता आहे. याबाबत सखोल संशोधन करण्याची गरज आहे. गुजरातशी जोडलेली संस्कृती नाळ खोडाईमाता अर्थात खोडीयार मातेच्या उपासनेचा गुजरातशी संबंध असल्याचे स्थानिक पातळीवर सांगितले जाते. नंदुरबार जिल्हा गुजरातला लागून असल्याने व्यापार, स्थलांतर, सामाजिक संबंध आणि धार्मिक परंपरेच्या माध्यमातून दोन्ही प्रदेशांमध्ये शतकानुशतके सांस्कृतिक देवाणघेवाण होत आली आहे. खोडाईमातेची उपासना यातूनच रुजली असावी, असे जाणकार सांगतात. भरवाड तसेच आदिवासी समाज बांधवांच्या लोकपरंपरा, उपासना पध्दतीचे दर्शन यातून घडत असते. पुढे हे देवस्थान सर्वत्र नावारूपाला येऊन विविध समाज बांधव यात्राकाळात श्रद्धेने मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत. खोडाईमाता यात्रा : एक लोकोत्सव नवरात्रीत खोडाईमाता यात्रेला प्रारंभ होतो. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ पाहायला मिळते. देवीची नियमित पुजा अर्चा आणि आरती होत असते. यात्रा काळात याठिकाणी झुले, पालख्या, खेळणी, खाद्यपदार्थ, घरगुती वस्तु आणि विविध दुकाने थाटली जातात. धर्म आणि श्रध्दा आणि मनोरंजन, व्यापार, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम खोडाईमाता यात्रेत पाहायाला मिळतो. दोन यात्रा, दोन परंपरा : एकच सांस्कृतिक ओळख शिंदे गावाची उमज माता आणि नंदुरबारची खोडाईमाता या दोन्ही यात्रांचे स्वरूप वेगळे असले तरी त्यांच्या मुळाशी असलेली भावना समान आहे. श्रध्दा आणि लोकसहभाग यात्रांचा मुळ आधार आहे. यात्रेत लोकविश्वास, नवस, परपंपरा, मनोरंजन आणि खरेदी-विक्रीतून होणारी उलाढाल यातून ग्रामिण अर्थव्यवस्थेची छाप दिसते. उमज माता असो की, खोडाईमाता या दोन्ही देवींचा यात्रोत्सवात प्रथा, परंपरा आणि नंदुरबारच्या मातीचा सुंगध आहे. लोकांच्या श्रद्धेची ताकद आहे. (लेखक नंदुरबार येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत.)
Read Entire Article